‘मावळ घटनेला योग्य ठरवणारे आव्हाड खरे जनरल डायर नव्हे का?’, सदाभाऊंचा सवाल

sadabhau khot

मुंबई: लखीमपूर घटनेवरून देशभर संताप व्यक्त करण्यात आला. तर कॉंग्रेसकडून योगी आदित्यनाथ यांना भारताचे आधुनिक जनरल डायर म्हटले गेले. आता यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

जालियनवाला बाग मध्ये लोकांवर गोळ्या घातल्या, तश्याच गोळ्या मावळ शेतकर्‍यांवर घातल्या गेल्या, हे साम्य आहे दोन्ही घटना मध्ये, कळलं का? असा खोचक सवाल करत त्या घटनेला योग्य ठरवणारे महाविकास आघाडी सरकार मधले मंत्री जितेंद्र आव्हाड हे भारतातील जनरल डायर नव्हे का? असा प्रतिसवाल सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान काल ११ ऑक्टोबररोजी महाविकास आघाडी सरकारने लखीमपुर घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक पुकारली होती. त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे भाजपने मात्र यावर निशाना साधत महाराष्ट्र बंदला विरोध केल्याचे दिसून आले. दरम्यान भाजपच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

विरोधकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्यावे. त्यांनी मावळ काढावं किंवा काहीही काढावं. पण एखादया केंद्रीय नेत्याच्या मुलाने समोर दिसत असतानाही त्यांच्या अंगावर गाडी घालणं आणि परत दोन गाड्या त्या मृतदेहांवरुन जाणं याबद्दल भारतीय जनतेच्या मनात नक्की चीड आहे. भारतातील मानवी संस्कारात सुसंस्कृतपणा आहे. अहिंसेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महात्मा गांधींचा हा देश आहे. तेव्हा नथुरामच्या चिल्ल्या पिल्यांना काय वाटतं याच्याशी आपलं काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.