सादिया इसिसमध्ये भरतीसाठी नव्हे, महाविद्यालय प्रवेशासाठी काश्मिरात गेली होती

पुणे  : काश्मीरमध्ये २६ जानेवारीला आत्मघातकी हल्ला करण्याच्या शक्यतेवरुन सादिया शेख हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशी केल्यानंतर तिला क्लीनचिट देऊन सोडण्यात आले. त्यानंतर सादिया प्रथमच माध्यमासमोर आली आहे. त्या घटनेचा माझ्या वर्तमानासह भविष्यावर परिणाम होत असल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले आहे.

माध्यमांशी बोलताना सादिया म्हणाली, की काश्मीर पोलिसांनी मला अटक केली नव्हती, मीच पोलिसांकडे गेले होते. २५ जानेवारीला वर्तमानपत्रात आलेली बातमी पाहून मी हादरले आणि पोलिसांशी संपर्क केला. काश्मीरमध्ये मी नर्सिंग कोर्सला प्रवेश घेण्यासाठी गेली होती, असाही तिने खुलासा केला आहे. पुढे बोलताना ती म्हणाली, की २०१५ मध्ये मी १२ वीत असतांना इसिसमुळे प्रभावित झाले. त्यामुळे इसिसशी संबंधित पोस्ट, मेसेज मी सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

त्यावरुन पुणे एटीएसने मौलवीकरवी माझे समुपदेशन केले होते. तो विषय तिथेच संपला होता. मात्र माझ्या भूतकाळाचा परिणाम माझ्या वर्तमान आणि भविष्यावर होत असल्याचे तिने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.