इशांत का सिराज, ‘विराट’प्रश्न ; सराव सामन्यात मिळालं उत्तर

इशांत

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप  अंतिम सामन्यासाठी सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्यास संघ व्यवस्थापन उत्सुक आहे. तर मोहम्मद सिराजला इशांत शर्माच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल. परंतु हा निर्णय विराटसाठी कठीण निर्णय असू शकतो. कारण ऑगस्ट 2019 च्या वेस्ट इंडीज दौर्‍यानंतर प्रथमच इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे सर्व निवडण्यासाठी उपलब्ध आहेत. अलिकडच्या वर्षांत परदेशात भारताच्या यशासाठी तिघेही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. अंतिम सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा होता. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली होती, तर दुसर्‍या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये तिसरा फास्ट बॉलर म्हणून मोहम्मद सिराजला खेळवायचं का इशांत शर्माला हा प्रश्न विराट कोहलीला सतावत होता, पण या मुकाबल्याआधी झालेल्या सराव सामन्यात विराटला याचं उत्तर मिळालं आहे. साऊथम्पटनमध्ये झालेल्या इंट्रास्क्वाड सामन्यात अनुभवी इशांत शर्मा युवा मोहम्मद सिराजवर भारी पडला, पण दोघांनीही उत्कृष्ट बॉलिंग करत आपण फॉर्ममध्ये असल्याचं कर्णधाराला दाखवून दिलं.

या सरावात भारताकडून 101 टेस्ट खेळणाऱ्या इशांतने 36 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 22 रन देऊन 2 विकेट मिळवल्या.  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये इशांतने 11 सामने खेळून 36 विकेट घेतल्या. इशांतने फक्त 17.36 च्या सरासरीने या विकेट मिळवल्या. एवढच नाही तर इशांतला इंग्लंडमध्ये 43 टेस्ट खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे जर इशांतला खेळवण्याचा विराटचा निर्णय असेल तर तो आश्चर्य वाटणार नसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या