हेच का भाजपचे बेगडे देशप्रेम…? संतप्त नागरिकांचा सवाल..!

मीरा-भाईंदर / प्राजक्त झावरे-पाटील : सीमेवर लढताना देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या बलिदानाने संपूर्ण देश हळहळला आहे. परंतु दुसरीकडे देशप्रेमाचे गोडवे गाणाऱ्या भाजपचे बेगडे देशप्रेम या निमित्ताने सर्वांसमोर आले आहे. संपूर्ण राज्यासहित ठाणे जिल्ह्यावर शोककळा पसरली असताना शहीद मेजर राणे यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरच भाजपचे नगरसेवक मांजरेकर यांनी आपला वाढदिवस अगदी धुमधडाक्यात आणि डीजेच्या दणक्यात साजरा केला.

भाजपचे आमदार ,महापौर , उपमहापौर, नगरसेवक यांच्या सहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या सर्वांंनी सोशल मीडियावर शहीद राणे यांना आंदरांजलीच्या पोस्ट टाकल्या आहेत. शहीद व त्यांच्या कुटुंबियांबद्दल असलेली भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिके बद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री काश्मिरच्या गुरेज सेक्टर मध्ये घुसखोर दहशतवाद्यांशी लढताना देशाचे चार जवान हुतात्मे झाले. या मध्ये 29 वर्ष वयाचे मीरारोड येथील मेजर कौस्तुभ राणे देखील शहिद झाले. मंगळवारी सकाळीच याची माहिती मिळाली. दुपार पासुन तर सोशल मिडीयावर तसेच बातम्यां मधुन सुध्दा मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे समजल्या नंतर त्यांच्या मीरारोड येथील घरी दुपार पासुनच लोकं जमू लागली. महत्वाचे म्हणजे स्वत: आमदार नरेंद्र मेहता देखील कुटुंबियांची भेट घेऊन आले.

केवळ मीरारोडच नव्हे तर राज्य व देशात या चार जवानांच्या बलिदानाबाबत शोक व्यक्त केला जात असताना अगदी शेजारच्या भागातील भाजपा नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मात्र आपला वाढदिवस जाहिरपणे धूमधडाक्यात साजरा केला. शहीद मेजर राणे यांच्या घरापासून अगदी काही पावलांच्या अंतरावर असलेल्या सेंट पॉल शाळेसमोर आलिशान मंडप टाकुन भाजपा नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते आदिंनी अगदी जल्लोष केला. या वेळी विविध थंडपेयांसह खाद्यपदार्थाची मोठी मेजवानी ठेवण्यात आली होती.

महापौर डिंपल मेहता यांच्यासह उपमहापौर चंद्रकांत वैती तसेच भाजपाचे प्रशांत दळवी, दिपीका अरोरा, हेमा बेलानी, दौलत गजरे, हेतल परमार, अनिता मुखर्जी, विविता नाईक, वंदना भावसार आदी नगरसेवक तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मांजरेकर यांनी केक कापला. या वेळी महापौर डिंपल व आमदार मेहता यांनी भाषण करत मांजरेकर यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान या प्रकरणी मांजरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत होता. हेच भाजपचे खरे रूप असल्याचे सांगत सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी टीका केली असून सदरचा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हंटले आहे.

संबंध देशभर देशद्रोही व देशप्रेमी अशी उथळ विभागणी करणाऱ्या भाजपची भाजप आमदार व लोकपदाधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे नक्कीच गोची झाली असल्याचे बोलले जात आहे.

आता उद्धव ठाकरे बाहेर पडल्यास सरकारला फरक पडत नाही – रामदास आठवले

राणेंच्या भाजप प्रवेशाला शुभेच्छा; शरद पवार