नांदेड फाट्याचा पूल पाकिस्तानमध्ये आहे का? संतप्त शिवसैनिकांचा सवाल

शिवसेनेचा पुलाच्या कामासाठी रस्तारोको

पुणे: पुणे ते सिंहगड, खडकवासला जाणाऱ्या रस्त्यावर नांदेड फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. अरुंदपूल आणि खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. आज या विरोधात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी गेली अनेक वर्षे रस्त्याचे काम बाळगलेले असल्याने नांदेड फाट्याचा पूल पाकिस्तानमध्ये आहे का असा संतप्त सवाल सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार दारू दुकाने बंद करण्यात आल्यानंतर नांदेड सिटीपर्यंतचा रस्ता मोठ्या तातडीने महापालिका क्षेत्रात घेतला गेला. मात्र दररोज हजारो पर्यटक, सामान्य नागरिक ज्या नांदेड पुलावरून प्रवास करतात त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक आमदार गावातल्या लोकांना निधी शहरात खर्च केला असे सांगतात आणि शहरातल्या लोकांना ग्रामीण भागात मात्र दोन्हीकडे कोणतीच कामे केली जात नसून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची टीका’ आंदोलनावेळी बोलताना रमेश कोंडे यांनी केली. तसेच पुढील पंधरा दिवसांत पुलाचा प्रश्नमार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना खडकवासला विधानसभा अध्यक्ष नितीन वाघ, उपजिल्हाप्रमुख महेश मते, दत्तानाना रायकर, शिवा पासलकर, पल्लवी पासलकर, महेश पोकळे, निलेश गिरमे, अमोल दांगट, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.