‘चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायपालिकाही त्यांच्या हाती आहे का? असा प्रश्न निर्माण होतो’

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेवर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलय. मात्र, त्यांच उत्तर म्हणजे अरेरावीची भाषा असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायपालिकाही त्यांच्या हाती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पराभव सहन करण्याची शक्ती देखील ठेवायला हवी. दुर्दैवाने त्यांना वारंवार पराभवाचे चटके बसणार आहेत. त्यामुळे त्यांनी सांभाळून बोलायला हवं, चंद्रकांत पाटील यांची भाषा अरेरावीची आहे. भाजप लोकशाहीची पायमल्ली करत ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा हातातील शस्त्र म्हणून वापरत आहे. पाटील यांच्या वक्तव्यामुळे न्यायपालिकाही त्यांच्या हाती आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या वतीने २०० पेक्षा जास्त जागी विजयी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, भाजपला १०० जागी देखील विजय मिळवता आला नाही. मात्र, भाजपच्या मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यातच गेल्या वेळी भाजपच्या ३ जागा असतांना या वेळी ७० पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. मात्र, या सर्वात भाजप आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे.

महत्त्वाच्या बातम्या