परभणी विधानसभा ; आमदार राहुल पाटलांच्या विरोधात आघाडीकडे स्ट्रॉंग उमेदवारचं नाही?

ऋषिकेश करभाजन :  लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांना महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात होणार असली तरी इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परभणीमध्ये गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची लाट होती मात्र या लाटेतून जनतेचा विश्वास आणि प्रेम मिळवत शिवसेनेचे उमेदवार डॉ.राहुल पाटील यांनी विजय मिळवला. राहुल पाटील यांच्या विरोधात भाजपा कडून कॉंग्रेस पक्षातून नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले आनंद भरोसे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी महापौर प्रताप देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर कॉंग्रेसतर्फे खान इरफान रहेमान अब्दुल रहेमान खान यांना तर AIMIM कडून सय्यद खालेद सय्यद साहेबजान ( माजू लाला ) यांना उमेदवारी देण्यात आली होती.
२०१४ विधानसभा निवडणुकीत राहुल पाटील यांची लढत AIMIM चे उमेदवार सय्यद खालेद सय्यद साहेबजान ( माजू लाला ) यांच्याशी झाली. त्यावेळी २६ हजार ५२६ मतांनी राहुल पाटील यांनी विजय मिळवला होता.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत AIMIM चे उमेदवार सय्यद खालेद सय्यद साहेबजान ( माजू लाला ) हे दुसऱ्या क्रमांकावर, भाजपचे आनंद भरोसे हे तिसऱ्या क्रमांकावर तर कॉंग्रेसचे खान इरफान रहेमान अब्दुल रहेमान खान हे चौथ्या क्रमांकावर होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझीटही जप्त झाले होते.
२०१४ ची विधानसभा निवडणुक सेना-भाजपाने स्वबळावर लढली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत सेना-भाजपची युती असल्याने परभणी विधानसभा मतदार संघ कोणाला सुटणार याबद्दल संभ्रम निर्माण झाले आहे.

२०१४ च्या निवडनुकीनंतर आमदार राहुल पाटील यांनी जनतेचा मिळवलेला विश्वास ही त्यांची ताकद मानली जाते. त्यामुळे राहुल पाटील यांनी अपक्षजरी उमेदवारी लढवली तरी त्यांचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले जात आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेचे उमेदवार राहुल पाटील यांच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडे हवातसा स्ट्रॉंग उमेदवार नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमदार राहुल पाटील यांच्या विरोधात आघाडी कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.