धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?; ॲड.असीम सरोदे म्हणतात…

पुणे:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेणू शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत हे आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला याची सर्व माहिती आहे, असं धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या पहिल्या बायकोचीच माहिती दिली होती. दुसऱ्या महिलेची माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधक करत आहेत.

ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड.असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे यांचं हे प्रेमप्रकरण असल्याचं दिसतं. या संबंधातून त्यांना दोन मुलंही झाली आहेत. त्याबाबतची तक्रार त्यांच्या कायदेशीर पत्नीने करायला हवी किंवा पहिल्या पत्नीने तक्रार केली नसेल तर दुसऱ्या महिलेने तक्रार केली पाहिजे. तरच ती तक्रार ग्राह्य धरली जाते. इतरांनी केलेली तक्रार ग्राह्य धरली जात नाही. तशी तक्रार करण्याचा कायदेशीररित्या कुणालाही अधिकार नाही.

महत्वाच्या बातम्या