fbpx

सिंचन घोटाळ्यातील आरोपीची आत्महत्या

thakkar jigar

टीम महाराष्ट्र देशा- विदर्भातील गोसिखुर्द सिंचन घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस तपास करीत आहेत. मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.मात्र पोलिसांनी ठक्करच्या गाडीतून सिंचन घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्याचा तपास सुरू आहे.

घाटकोपरला राहणारा जिगर सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर येथील त्याच्या कार्यालयातील काम उरकून मरीन ड्राइव्ह येथील एका बँकेत आला होता. तेथून त्याने मरिन प्लाझा गाठले. नंतर त्याने चालक सुनील सिंग याला गाडी पार्क करायला सांगितले.ड्रायव्हरला बाजूला जायला सांगून त्याने आपल्याकडील परवाना असलेल्या रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपविले.गोळीचा आवाज ऐकून चालकाने गाडीचे दार उघडले. मालकाला गोळी लागून पडलेला पाहून घाबरलेल्या चालकाने पोलिसांना घटनेची माहिती कळवली. जी. टी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले

घोटाळ्याचे आरोपपत्रही दाखल

मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा मातीकाम व बांधकामाचे कंत्राट मुंबईतील आर. जे. शहा आणि कंपनी आणि डी ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि. कंपनीला देण्यात आले होते. त्यात गैरप्रकार झाल्याचा दावा करीत एसीबीने दोन्ही कंपन्यांचे संचालक कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, त्यांच्या भागीदार कंपनीचे संचालक विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, जिगर प्रवीण ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, तत्कालीन कार्यकारी अभियंता उमाशंकर वासुदेव पर्वते व विभागीय लेखाधिकारी चंदन जिभकाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर जानेवारीत एसीबीकडून ४ हजार ४५७ पानांचे आरोपपत्रही दाखल केले आहे.