मार्गदर्शन घेण्यासाठी इरोम शर्मिला अण्णा हजारेंच्या भेटीला

राळेगणसिद्धी : मणिपूरमध्ये सैन्य बलाच्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. आज मी भरकटलेली सामान्य कार्यकर्ती आहे. पण समाजासाठी मला काहीतरी करायचंय. त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी मी अण्णांकडे आले आहे असे शर्मिला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मणिपूरमध्ये सैन्य बलाच्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात 16 वर्षे उपोषण केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आज राळेगणसिदिधी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने शर्मिला ह्या आता तमिलनाडु मध्ये राहतात. त्यांनी अण्णांना सांगीतले की माझा संघर्ष यापुढेही जारी राहील. त्यासाठी मला अण्णांचे आशीर्वाद हवे आहेत. यावेळी अण्णांनी त्यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

अण्णा म्हणाले की, त्यांच्या उपोषण काळातही आपण त्यांना समर्थन दिले होते. समाजाच्या हितासाठी शर्मिला सारखे लोक पूर्ण वेडे होऊन काम करतात, अशा समर्पित कार्यकर्त्यांची देशाला गरज आहे. आंदोलनात यश अपयश येतच असते. पण आपण नैराश्य येऊ द्यायचे नसते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करताना मलाही खूप त्रास झाला. जेलमध्ये जावे लागले. धमक्यांना सामोरे जावे लागले. पण अशा वेळी तुम्हाला डगमगून चालत नाही. तरच तुम्ही समाजासाठी काहीतरी करू शकता. त्यासाठी निर्भय होऊन निष्काम भावनेने कार्य सुरू ठेवावे. त्यामुळे पूर्वी काय झाले हे विसरून कार्यरत रहावे. निष्काम सेवेतून तुम्हाला खरा आनंद मिळेल.

अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीस आपले नेहमीच सक्रीय समर्थन असेल असेही शर्मिला यांनी सांगितले. मणिपूर हे आजही विकासापासून वंचित असून तिथे सामान्य लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. तिथे साधे रस्तेही नसून अण्णांनी एकदा मणिपूरमध्ये यावे अशी विनंती त्यांनी केली. आपण समर्पित भावनेने समाजाच्या हितासाठी काही करत असताना लोक मात्र उदासिन असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 16 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यात आपल्याला सुरुवातीस लोकांचा पाठिंबा मिळाला. पण हळूहळू तो कमी होत गेला. त्यामुळे तिथे एक व्यापक जनआंदोलन उभे राहू शकले नाही. आज मी एक भरकटलेली सामान्य कार्यकर्ती आहे. पण समाजासाठी मला काहीतरी करायचंय. त्याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी मी अण्णांकडे आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.