पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट आता निवडणुकीच्या रिंगणात ?

टीम महाराष्ट्र देशा : पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट मानले जाणारे आणि खंडणी विरोधात कारवाई करून गुंडांची पळताभुई करणारे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेचा मुदतपूर्व राजीनामा दिला आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप युतीकडून त्यांना मुंबईच्या अंधेरी, साकिनाक, किंवा नालासोपारा या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रदीप शर्मा यांनी भाजप नेत्यांशी चांगलीच जवळीकता वाढवली आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत युतीकडून प्रदीप शर्माची उमेदवारी निश्चित असल्याचं दिसत आहे.

दरम्यान शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेत अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी आपला बहुतांश काळ हा मुंबईतील गुन्हे शाखा आणि विशेष दलात घालवला आहे. गुन्हे शाखेत असताना शर्मा यांनी तब्बल ११३ गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून ठाणे येथे खंडणी विरोधी पथकात कार्यरत होते. मात्र विधानसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा असल्याने प्रदीप शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे.