बेताल वक्तव्य करणाऱ्या IPS भाग्यश्री नवटक्के यांना बडतर्फ करण्याची मागणी

बीड : “अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते. अनुसूचित जातीमधील 21 व्यक्तींना फोडून काढले आहे,” असे धक्कादायक वक्तव्य एका महिला IPS अधिकाऱ्याने केले आहे. माजलगावच्या डीवायएसपी भाग्यश्री नवटक्के यांच्या बेताल वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप वायरल झाली आहे. या वक्तव्याचे निषेध व्यक्त करण्यात येतोय.

जीन्स पॅन्ट आणि टीशर्ट परिधान करून एका सभागृहात खुर्चीवर बसून भाग्यश्री नवटक्के यांनी ही चर्चा केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यांच्या समोर बसलेले आरोपी आहेत, तर काही आरोपींचे सहकारी मित्र. मागील एका प्रकरणात अट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि दलितांना धडा कसा शिकवला हे सांगताना त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण होत होतं ते त्यांच्या लक्षात आलं नाही. महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असलेल्या या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचे दलित समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय.

दरम्यान,या व्हिडिओ प्रकरणी स्थानिक दलित संघटनेच्या तक्रारीवरुन बीडचे पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंदराजन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी नवटक्के यांच्याविरुद्ध सोमवारपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आपण कोर्टात जाऊ असा इशारा दिला आहे.