धोनीचं चेन्नई सुपरकिंग्जमध्ये ‘कमबॅक’

आयपीएल स्पर्धेच्या अर्थसंकल्पातही वाढ ; आगामी स्पर्धेसाठीच्या अर्थसंकल्पात ८० कोटींची तरतूद

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा आयपीएल सामन्यांत चेन्नई सुपरकिंग्ज संघातर्फे खेळणार आहे.आयपीएल संचालन समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आयपीएल संघमालकांना आता पाच खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची (रिटेन करण्याची) मुभा देण्यात आली आहे.गेल्या वर्षाच्या संघातील सर्वोत्तम पाच खेळाडूंना सुपरकिंग्जमध्ये पुन्हा घेण्याचा निर्णय फ्रेंचाइजने घेतला असल्याची माहिती संचालन परिषदेने दिली.

यापूर्वीच्या अर्थसंकल्पात ६६ कोटींची तरतूद होती.चेन्नई सुपरकिंग्जच्या संघाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर संघ पुन्हा आयपीएलमध्ये उतरणार आहे. धोनी या संघाचे पुन्हा नेतृत्व करेल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. तीन खेळाडूंना रिटेन केल्यास एका खेळाडूला १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूला ११ कोटी आणि तिसऱ्या खेळाडूला ७ कोटी रुपये मिळू शकतात. जर एखाद्या संघाने केवळ दोनच खेळाडूंना रिटेन केले तर पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला ८.५ कोटी मिळू शकतील. यामध्ये एकच खेळाडू रिटेन करायचा झाल्यास संघाला १२.५ कोटी रुपये मोजावे लागू शकतात. याशिवाय संचालन समितीने आयपीएलच्या आगामी स्पर्धेसाठीच्या अर्थसंकल्पात ८० कोटींची तरतूद केली आहे. २०१९ मध्ये रंगणाऱ्या स्पर्धेत अर्थसंकल्पात तब्बल २ कोटींनी वाढ करण्यात येणार असून २०२० मध्ये ८५ कोटींपर्यंत ही रक्कम वाढवण्यात येणार आहे.