#IPL : डेक्कन चार्जर्स ते सनरायझर्स हैद्राबादचा एक विलक्षण प्रवास…..!

Deccan Chargers

दिग्विजय दीक्षित, पुणे: IPL च्या पहिल्या मोसमापासून डेक्कन चार्जर्सचा संघ इतर संघांच्या बरोबरीने IPL च्या शर्यतीत उतरला होता. पहिल्या मोसमात अंकतालिकेत केवळ दोनच सामने जिंकत हा संघ शेवटच्या स्थानावर राहिला. सायमंड्सचे मधेच निघून जाणे, लक्ष्मणला झालेली दुखापत इत्यादी या गोष्टीची कारणे म्हणता येतील परंतु २००९ साली ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ऍडम गिलख्रिस्त कडे कर्णधारपदाची सुत्रे गेली आणि या संघाने संपूर्णरीत्या ‘U turn’ घेतला. गिलख्रिस्तने संपूर्ण मोसमात कप्तानी आणि फलंदाजीने डेक्कनला यशस्वी केले असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही. याच मोसमात रोहित शर्मा या डेक्कनच्या खेळाडूला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झाला.

यानंतर मात्र २०१० च्या मोसमातील प्रमुख ४ संघांमध्ये समावेशाव्यतिरिक्त हा संघ फारशी चमक दाखवू शकला नाही. २०१२ साली तर आर्थिक व्यवहारातील कारणे देत IPL व्यवस्थापनाकडून डेक्कन चार्जर्स ऐवजी सनरायझर्स हैद्राबाद या नवीन संघाचा समावेश IPL मध्ये करण्यात आला. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कदाचित डेक्कन चार्जर्सच्या मालकांना मोठी रक्कम द्यावी लागू शकते.

यानंतर हैद्राबाद संघाची मालकी मिळाल्यानंतर कुमार संगक्कारा आणि कॅमेरून व्हाइट यांनी २०१३ साली अनुक्रमे कर्णधारपद सांभाळून हैद्राबाद संघाचे प्रतिनिधीत्व केले, परंतु हा संघ तितकीशी चांगली कामगिरी करू शकला नाही. २०१५ साली ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरकडे या संघाचे कर्णधारपद आले आणि हळूहळू संघाने चांगल्या दिशेने पाऊले टाकायला सुरवात केली.

याकाळात फक्त कप्तान पदावर लक्ष केंद्रित न करता वॉर्नरने आपल्या फलंदाजीने लोकांचे लक्ष वेधले, कर्णधार झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात सर्वाधिक धावा करून मानाची ‘ऑरेंज कॅप’ मिळवली आणि दुसऱ्या प्रयत्नात २०१६ साली हैद्राबादला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी झाला.

२०१६ साली झालेला अंतिम सामना आजही डोळ्यासमोर येतो, जेव्हा समोर तुफान फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली आणि बँगलोर यांचे कडवे आव्हान होते. या मोसमात कोहलीने जणू धावांचा रतीब घालत तब्बल ४ शतके आणि जवळपास १००० धावा केल्या होत्या. परंतु ‘T-२० हा फलंदाजांचा खेळ आहे’ हा निव्वळ गैरसमज आहे, हेच हैद्राबादच्या संघाने आणि डेव्हिड वॉर्नरच्या कप्तानीने त्या दिवशी सिद्ध केले. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार, बांगलादेशचा मुस्तफीझुर यांच्या कामगिरीने संपूर्ण शृंखलेतील कामगिरीमुळे आणि बेन कटिंग यांच्यामुळे तो अंतिम अटीतटीचा सामना हैद्राबादने जिंकून त्यांचा पहिला IPL चषक जिंकला…! याचवर्षी भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट्स घेत मानाची ‘पर्पल कॅप’ मिळवली. या संपूर्ण सत्रात हैदराबादच्या गोलंदाजांनी आणि वॉर्नर-धवनच्या फलंदाजीने कमाल करत ही कामगिरी करून दाखवली.

ज्यावेळी ‘डेक्कन चार्जर्स’ वरून ‘सनरायझर्स हैद्राबाद’ हा संघ बनला त्यावेळी बरेच खेळाडू हैद्राबादने टिकवून ठेवले होते, थोडक्यात केवळ संघाचे नाव आणि व्यवस्थापन बदल यामुळे या संघाने भरारी मारली. २००९ साली डेक्कनला मिळालेला चषक आणि २०१६ साली हैद्राबादला मिळालेला एक चषक ह्या या संघांच्या आजपर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरींसाठी सर्व क्रिकेटप्रेमींकडून या संघांना भरभरून पाठिंबा मिळालेला आहे आणि यापुढेही मिळतच राहील. यंदाच्या दुबईमधील IPL मध्ये हैद्राबादचा संघ वॉर्नरच्या नेतृत्वात सर्वोत्तम कामगिरी करेल अशी अपेक्षा करूयात.

महत्वाच्या बातम्या:-