मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पंजाब किंग्जने आपले प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम राखले आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या लीगच्या ६०व्या सामन्यात पंजाबने स्फोटक फलंदाजी आणि अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB vs PBKS) ५४ धावांनी पराभव केला. या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या जबरदस्त अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने बंगळरुसमोर २०९ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात बंगळुरुकडून एकाही फलंदाजाने मोठी खेळी केली नाही आणि २० षटकात त्यांना ९ बाद १५५ धावांपर्यंतच पोहोचता आले. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.
बंगळुरूचा डाव
पंजाबच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि कप्तान फाफ डु प्लेसिस यांनी आश्वासक सुरुवात केली, पण खराब फॉर्मात असलेल्या विराटला कगिसो रबाडाची नजर लागली. विराटला (२०)त्याने राहुल चहरककरवी झेलबाद केले. त्यानंतर ऋषी धवनने डु प्लेसिस (१०) आणि महिपाल लोमरोर (६) या दोन विकेट्स घेत बंगळुरुला संकटात टाकले. रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांवी संघाला शतकापार पोहोचवले. चहरने पाटीदारला (२६) झेलबाद करत ही भागीदारी मोडली. पुढच्याच षटकात मॅक्सवेलही तंबूत परतला. त्याने ३ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावांची सर्वाधिक खेळी केली. फिनीशर दिनेश कार्तिकही (११) आज काही जादू दाखवू शकला नाही. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याला राजपक्षेकरवी झेलबाद केले. २० षटकात बंगळुरूचा डाव ९ बाद १५५ धावांपर्यंत पोहोचला. पंजाबकडून कगिसो रबाडाने ३ बळी घेतले. तर ऋषी धवन आणि राहुल चहर यांना २ बळी मिळाले.
We still believe 🤞🏻#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #RCBvPBKS pic.twitter.com/yL5Of9Ygqr
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 13, 2022
पंजाबचा डाव
सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी पंजाबसाठी ६० धावांची सलामी दिली. बेअरस्टोने आक्रमक शैलीत फटकेबाजी केली. फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने धवनची (१५) दांडी गूल करत बंगळुरुला पहिले यश दिले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात बेअरस्टोने २३ धावा कुटत आपले २१ चेंडूत वेगवान अर्धशतक फलकावर लावले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. धवननंतर आलेला भानुका राजपक्षे (१) स्वस्तात बाद झाला. नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शाहबाझ अहमदने बेअरस्टोला फसवले. बेअरस्टोने २९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह ६६ धावा फटकावल्या. स्पर्धेत सर्वात मोठा षटकार मारलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने कप्तान मयंक अग्रवालसोबत डाव सांभाळला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. १५व्या षटकात मयंकला (१९) हर्षल पटेलने बाद केले, तर जितेश शर्मा (९) पुढच्या षटकात वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. १९व्या षटकात लिव्हिंगस्टोनने आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याला हर्षलने माघारी पाठवले. लिव्हिंगस्टोनने ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७० धावा केल्या. या षटकात हर्षलने फक्त चार धावा दिल्या. २० षटकात पंजाबने ८ बाद २०९ धावा केल्या. बंगळुरूकडून हर्षलने ४ बळी घेतले, तर हसरंगाने १५ धावांत २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड.
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल (कप्तान), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, कगिसो रबाडा, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com