मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात अटीतटीचा सामना रंगला. स्पर्धेच्या ६५व्या सामन्यात हैदराबादने मुंबईला ३ धावांनी हरवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने मुंबईला १९४ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात मुंबईसाठी रोहित-इशानने चांगली सुरुवात केली. त्यानंतर मधली फळी ढासळल्यानंतर टिम डेव्हिडने धुवांधार फलंदाजी करत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला, पण १८व्या षटकात तो बाद झाला आणि मुंबईने सामना गमावला. हा मुंबईचा दहावा पराभव ठरला.
मुंबईचा डाव
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून कप्तान रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९५ धावा केल्या. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी मोडली आणि रोहितला अर्धशतकापासून वंचित ठेवले. रोहितने २ चौकार आणि ४ षटकारांसह ४८ धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात उमरान मलिकने किशनला प्रियम गर्गकरवी झेलबाद केले. किशनने ५ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. मुंबईचा आधारस्तंभ तिलक वर्मा (१), डॅनियल सॅम्स (१५) यांनाही उमरानने बाद करत मुंबईला अडचणीत टाकले. ट्रिस्टन स्टब्स (२) १७व्या षटकात धावबाद झाला. टिम डेव्हिडने १८व्या षटकात नटराजनला २६ धावा चोपत सामन्यात रंगत निर्माण केली. डेव्हिडने नटराजनला ४ षटकार ठोकले, पण षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो धावबाद झाला. त्याने १८ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह ४६ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने १९वे षटक निर्धाव टाकत विजय मुंबईपासून दूर नेला. शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती, पण फजलहक फारुकीने टाकलेल्या या षटकात मुंबईला १५ धावाच घेता आल्या. २० षटकात मुंबईला ७ बाद १९० धावांपर्यंत पोहोचता आले. हैदराबादकडून उमरानने २३ धावांत ३ बळी घेतले.
We fell short by just 3 runs. 😞#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #MIvSRH pic.twitter.com/HLhQHqQUI9
— Mumbai Indians (@mipaltan) May 17, 2022
हैदराबादचा डाव
मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्माला (९) स्वस्तात बाद करत मुंबईला चांगली सुरुवात मिळवून दिली, पण त्यानंतर राहुल त्रिपाठी आणि प्रियम गर्ग यांनी उत्तम भागीदारी केली. दोघांनी आक्रमक फटके खेळत मुंबईच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. १०व्या षटकात रमणदीप सिंगने गर्गला बाद करत ही भागीदारी मोडली. गर्गने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. त्रिपाठीने निकोलस पूरनला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली. १८व्या षटकात अर्धशतक ठोकलेला त्रिपाठी बाद झाला. रमणदीपनेच त्याला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. त्रिपाठीने ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७६ धावा केल्या. पूरनने २ चौकार आणि ३ षटकारांसह ३८ धावा करत हैदराबादला दोनशेच्या जवळ पोहोचवले. २० षटकात हैदराबादने ६ बाद १९३ धावा फलकावर लावल्या.
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कप्तान), डॅनियल सॅम्स, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, संजय यादव, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे.
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कप्तान), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com