मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ६३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सला (LSG vs RR) २४ धावांनी हरवत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल (४१) आणि देवदत्त पडिक्कल (३९) यांच्या जोरावर राजस्थानने लखनऊला १७९ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात दीपक हुड्डा (५९) व्यतिरिक्त लखनऊचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही आणि त्यांचा डाव २० षटकात ८ बाद १५४ धावांवर संपला. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने चमकदार कामगिरी करत २ बळी घेतले.
लखनऊचा डाव
राजस्थानच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊने केएल राहुल (१०) आणि क्विंटन डी कॉक (७) या दोन सलामीवीरांना स्वस्तात गमावले. ट्रेंट बोल्टने डी कॉकला तर प्रसिध कृष्णाने राहुलला तंबूत पाठवले. आयुष बदोनीला बोल्टने खातेही खोलू दिले नाही. मधल्या फळीत दीपक हुडाने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावा केल्या, पण त्याला दुसऱ्या बाजूने योग्य साथ लाभली नाही. १६व्या षटकात हुडाला चहलने बाद केले आणि लखनऊच्या विजयाच्या आशा मावळल्या. २० षटकात लखनऊला ८ बाद १५४ धावांपर्यंतच पोहोचता आले. बोल्टव्यतिरिक्त कृष्णा आणि मकॉयने प्रत्येकी २ बळी घेतले.
Top win. Two points. 💗🔒#LSGvRR | #IPL2022 | #HallaBol | #RoyalsFamily pic.twitter.com/QEplj03BLs
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 15, 2022
राजस्थानचा डाव
जोस बटलर पुन्हा एकदा चांगली सलामी देण्यात अपयशी ठरला. लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खानने बटलरची (२) दांडी गूल केली. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनसोबत यशस्वी जयस्वालने अर्धशतकी भागीदारी केली. चांगले फटके खेळणारा सॅमसन पुन्हा एकदा बेजबाबदार फटका खेळून जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ६ चौकारांसह ३२ धावा केल्या. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या जयस्वालला आयुष बदोनीने तंबूत पाठवले. जयस्वालने ६ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावा केल्या. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने १८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांची झटपट खेळी केली. १४व्या षटकात रवी बिश्नोईने त्याला फसवले. त्यानंतर रियान पराग (१७), जिमी नीशम (१४) आणि ट्रेंट बोल्ट (१७) यांच्या धावांच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ६ बाद १७८ अशी मजल मारली. लखनऊकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ बळी घेतले.
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कप्तान), दीपक हुडा, कृणाल पंड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डर, मोहसिन खान, रवी बिश्नोई, दुष्मंथा चमीरा, आवेश खान
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन(यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, जेम्स नीशम, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेद मकॉय.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com