धोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा

वेबटीम  : महेंद्रसिंग धोनी अर्थात माही हा भारतीयच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांच्या गळ्यातील ताईत आहे हे सर्वश्रुत आहेच. चेन्नई सुपरकिंग्स भलेही दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत असले तरी या टीमच्या चाहत्यांमध्ये जराही कमतरता झाली नाही. याचाच प्रत्यय पुण्यात रंगलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात आला.

या सामन्यावेळी धोनीच्या एका चाहतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. धोनीच्या या चाहतीचा फोटोही व्हायरल झाला आहे. इतकेच नाहीतर आसीसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन तिचा फोटोही शेअर केला आहे. धोनीच्या या चाहतीने एक बोर्ड हातात घेतले होते. त्यावर लिहिलेला संदेश सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरत आहे. विशेष म्हणजे आयसीसीनेही आपल्या ट्विटर हँडलवरून संबधित छायाचित्र पोस्ट करून धोनीच्या लोकप्रियतेला दाद दिली आहे.

‘भविष्यातील जोडीदाराने मला माफ करावं, कारण एम. एस. धोनी हेच माझं पहिलं प्रेम राहणार आहे’ असा संदेश लिहिलेलं हे पोस्टर ही तरुणी सतत हात उंचावून दाखवत होती. अनेक कॅमेऱ्यांनी हा फोटो टिपला. हा फोटो सोशल मीडियातही वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर धोनीच्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत.