ज्योती देवेरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा, असीम सरोदेंमार्फत एसीबीकडे तक्रार

असीम सरोदे

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे ऑडीओ क्लिपमुळे चर्चेत आल्या होत्या. पण आता ज्योती देवरे यांची जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नगरमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार नीलेश लंके व जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. या भावनिक क्लिपमुळे राज्यातील राजकारण तापले होते. यानंतर आमदार लंकेंवर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले होते.

देवरे यांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते त्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना पाठविला होता. तसेच क्लिपची चौकशीचा अहवालही वरिष्ठांना पाठविला होता. त्यानुसार देवरे यांच्या बदलीचा आदेश आज राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांना काढला आहे.

दरम्यान, ज्योती देवरे यांनी अपल्या पदाचा दुरुपयोग करून केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी जातेगाव (ता. पारनेर) येथील नागरिक कारभारी भाऊसाहेब पोटघन यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात केली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांना मंगळवारी तक्रार अर्ज देण्यात आला.

या तक्रारीसंदर्भात ॲड. सरोदे यांनी सांगितले की, नगर येथील जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार देवरे यांच्याबाबत नेमलेल्या समितीने नुकताच अहवाल दिला आहे. या अहवालात देवरे यांनी वाळूउपसा केलेली वाहने जप्त केल्यानंतर कुठलेही सरकारी शुल्क भरून न घेता ती वाहने सोडून दिली, अकृषक कामासाठी जमीन हस्तांतरित करताना अनियमितता, वाळू तस्करांना संरक्षण देणे तसेच देवरे या जळगाव येथे कार्यरत असतानाही भ्रष्टाचार केल्याच्या बाबी अहवालात नमूद आहेत. देवरे यांची बदली झालेली असली तरी कामाचे स्वरूप तेच राहणार आहे. त्यामुळे देवरे यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी पोटघन यांची आहे.

महत्वाच्या बातम्या