fbpx

महिला दिन वेगळा साजरा करण्याची गरज नष्ट होवो हीच प्रार्थना

नेहा बारगजे : आज 8 मार्च अख्ख्या जगभरात महिला दिन साजरा होणार आज. आज तिला मान दिला जाणार , आज तिच्या अस्तित्वाला सन्मान दिला जाणार, आज तिच्या गुणांचं कौतुक केलं जाणार , आज तिला तिच्या असण्याचं महत्व सांगितलं जाणार.आज तिला तिच्याच असण्याची जाणीव करून दिली जाणार . जगभरात मान्यताप्राप्त झालेला आणि एखाद्या सणासारखा साजरा केला जाणार हा दिवस . महिलांना आनंद देण्यासाठी , त्यांना हवा तसं वागण्याचं , हवं ते करण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी आजचा खास दिवस जणू बाजूला काढून ठेवलेला असतो .आजच्या दिवशी महिलांना सकाळी उठल्यापासून अराम दिला जातो , त्यांच्यासमोर आयतं ताट आणून ठेवलं जातं , त्यांना गिफ्ट्स दिले जातात , त्यांना कुठेही जाण्याची , काहीही घालण्याची मुभा दिली जाते , त्यांच्याप्रती वाटणारं प्रेम खासकरून व्यक्त केलं जातं , त्यांना त्यांच्या स्त्री असण्यावर अभिमान वाटावा असं काहीसं वागलं जातं.

फक्त आजचाच दिवस ? खरं तर एखादी गोष्ट स्वीकारताना तिला फॉलो करताना आपण त्याची वैचारिक पडताळणी कितपत करतो ? महिला दिन हा महिलांसाठी, त्यांना स्पेशल फील करून देण्यासाठी साजरा करण्याचा हेतू असतो . किंवा या पुरुषप्रधान जगात महिलांना किमान एक दिवस तरी त्यांच्या मनाप्रमाणे राहता यावं , हाही यामागचा हेतू असतो. पण महिलांना त्यांचं अस्तित्व पटवून देण्यासाठी , त्यांचं महत्व सांगण्यासाठी खरंच एक वेगळ्या दिवसाची गरज कितपत आहे किंवा असायला हवी याचा आपल्यापैकी कितीजणांनी विचार केला असेल ? किंवा महिलांना या सगळ्या बडेजावपणाची गरज आहे.

असा समज आपण का करून घेतो ? जसं एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी आपल्याला struggle करून ती गोष्ट मिळवावी लागते किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी आपण कुणालातरी काहीतरी देतो. हा एकच दिवस महिलांना मानसन्मान देऊन त्यांना महान करणं हेही एक प्रकारे दान असल्यासारखं नाही का? मुळात एक स्त्री ला ती स्त्री आहे हे जाणवून देण्याची गरज नाहीच . तिची कामगिरी किंवा तिचं महत्व दाखवण्यासाठी एका ठराविक दिवसाची गरज वाटावी, हे पुरुषप्रधान संस्कृतीचं सर्वात मोठं उदाहरण म्हणता येणार नाही का ? आज स्त्रिया फक्त घराबाहेरच नाही तर मंगळावर जाऊन आल्या आहेत . पण तरीही समाजाच्या आणि घराच्या चौकटीत तिला अजूनही तिच्या हक्काचं आयुष्य तिला जगता येत नाही.

स्त्री पुरुष समानतेवर आपण इतकी भाष्य करतो . पण ती फक्त शब्दात दिसते वागण्यात नाही . याची कितीतरी उदाहरणं देता येतील . जशी की , जर एक घरात स्त्री पुरुष दोघे काम करत असतील तर , पुरुष सकाळी उठून आवरून आयता डबा घेऊन जातो आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर त्याच्या समोर लगेच गरम चहा आणि जेवण असावं , आणि जेवण उरकून ऑफिचं काम करायला निवांत वेळ मिळणे ही त्यांची अपेक्षा असते . तेच स्त्रियांना मात्र सकाळी उठून घर आवरून स्वतःचा , नवऱ्याचा डबा , घरच्यांसाठी जेवण करून ऑफिस ला जाणे , घरी परत आल्यावर स्वतःच्या थकव्याची पर्वा न करता लगेच कामाला लागणे , रात्री उशिरा सगळं आवरून ऑफिसचं उरलेलं काम करणे , आणि कधीकधी पतीचा मूड असेल तर तो पूर्ण करणे , मग उरलेलं ऑफिस वर्क करणे , रात्री उशिरा झोपणे सकाळी लवकर उठणे पुन्हा तेच रुटीन . हेच जर पुरुषाने स्त्रीची कामं वाटून घेऊन तिलाही अराम देण्याचा कॉमन सेन्स वापरला तर प्रत्येक दिवस तिच्यासाठी महिला दिन नाही का ? फक्त एक दिवस तिला हवं ते आणि हवं तसं करण्याचं स्वातंत्र्य देणारे आपण कोण ? हा साधा विचारही आपण करत नाही.

एका ठिकाणी एक वाक्य वाचण्यात आलं. बी अ मॅन , रिस्पेक्ट वूमन . इथेही तेच . स्त्री ला मान देणं , तिला तिचेच हक्क मोठ्या अभिमानाने देणं म्हणजे एखाद्या कैद्याला काही वेळ स्वतंत्र सोडल्यासारखं झालं. आणि स्त्री म्हणजे कैदी नाही. आपल्यासारखीच निसर्गाच्या अविष्कारातून उत्पन्न झालेला एक जीव आहे . तिला वेगळी वागणूक द्यायची काय गरज ? समाजाने स्त्रीला एक माणूस बघावं एवढीच साधी सरळ सोप्पी अपेक्षा असते स्त्रियांची आणि हे त्यांना मागायला लागूच नये. हा त्यांचा inbuilt हक्क आहे . एखाद्या पुरुषासाठी कधीच सांगावं लागत नाही की पुरुषांना मान द्या . तसं स्त्रीयांसाठीही हे सांगायची वेळ येऊ नये की स्त्रियांना मान द्या , त्यांचा सन्मान करा , स्त्रियाना समानता द्या , त्यांना समान हक्क द्या.

समाजातल्या इतर कोणाही बाबतीत हे दाखवायची गरज पडत नाही इतक्या नैसर्गिक पद्धतीने सगळ्या गोष्टी घडतात त्याच स्त्रियांच्या बाबतीत व्हाव्यात ही खरी अपेक्षा असते स्त्रियांची. एका दिवसाचं प्रेम दाखवण्यापेक्षा दररोज एक माणूस म्हणून समानतेने वागणूक दिली तर प्रत्येक दिवस हा महिला दिवस होऊन जाईल . त्यासाठी अश्या वेगळ्या दिवसाची गरज भासणार नाही. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांसाठी एक वेगळा दिवस राखून ठेवण्याची आणि त्याच दिवशी त्यांच्यावरील प्रेम आदर दाखवायची प्रथा बंद होणार नाही. ज्या दिवशी पुरुषाला जा बांगड्या भर हे वाक्य अपमान वाटणं बंद होईल , तो दिवस हा खराम हिला दिवस असायला हवा. आणि तोपर्यंत महिलांना या एकाच दिवशी स्वतःचा अस्तित्व अनुभवून समाधान मानावं लागेल. आज काही ठिकाणी बदल घडल्याचं दिसून येत आहे . ही आनंदाची बाब नक्कीच आहे.

या बदलांकडे कानाडोळा करून चालणार नाही . पण जोपर्यंत एखादी गोष्ट मुळासकट संपत नाही तोपर्यंत तिचा नायनाट झाला असं म्हणता येत नाही .तरी काही भागांत दिसून आलेल्या सकारात्मक बदलासाठी महिला दिनाच्या शुभेच्छा देणं हे भाग बनतं . सो , बदल झालेल्यामानसिकतेच्या माणसांसाठी (human) महिला दिनाच्या खूप शुभेच्छा . आणि खूप खूप सदिच्छा बदल घडवू पाहणाऱ्या माणसांसाठी .येणारी वर्ष आपल्याला बदलासाठी शक्ती देवो आणि महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरज नष्ट होवो हीच प्रार्थना .त्याऐवजी माणूस दिन साजरा होवो हीच सदिच्छा .

2 Comments

Click here to post a comment