डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत आमदार प्रकाश गजभिये यांची लक्षवेधी…

International Monument of Dr. Babasaheb Ambedkar

नागपूर – मुंबईतील इंदूमिल येथे होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन होवूनही स्मारकाची साधी वीटही सरकारने रचली नाही आणि तेथील जमीनीचे हस्तांतरण झालेले नाही शिवाय स्मारक आराखडयाला सरकारने मंजुरी दिली नसल्याची गंभीर बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आराखडयाला मंजुरी दिल्याची माहिती सभागृहामध्ये दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या आराखडयाला मंजुरी दिली असेल तर मुख्यमंत्र्यांनी तसा आराखडा सादर करावा अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी केल्यानंतर मंजुरीचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रकाश गजभिये यांच्याकडे दिला.

मुख्यमंत्र्यांनी आराखडा मंजुरीशी दिला मात्र एकूण ४.८४ हेक्टरमधील २.०३ हेक्टर जागा अजुनही हस्तांतरण झालेली नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एक वर्षभरात याही जमीनीचे हस्तांतरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

आमदार प्रकाश गजभिये यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मुद्दा सातत्याने लावून धरला असून मागील हिवाळी अधिवेशनामध्ये आणि विनंती अर्जसमितीच्या बैठकीत एमएमआरडीए व नगरविकासखात्याच्या अधिकाऱ्यांनी आराखडयाला मंजुरी नसल्याची माहिती दिली होती. त्यावेळी आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजप सरकार आंबेडकरी जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आज पावसाळी अधिवेशनात बाबासाहेबांच्या स्मारकाचा आराखडा आणि जमीन हस्तांतरणाचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात मांडला. त्यावर ९ जुलै २०१८ रोजी या आराखडयाला मंजुरी दिल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर केले.