fbpx

भारताच्या कुटनीत्तीचा विजय, कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती

kulbhushan jadhav

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या कुटनीतीचा विजय झाला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कुलभूषण बाबतच्या आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या या निकालानंतर भारताकडून असलेले कुलभूषण यांचे वकील हरीश साळवे यांचे अभिनंदन केले जात आहे.

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याचे भारतात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर भारताने या निर्णयाविरोधात ८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्या. अब्दुलक्वी अहमद युसूफ यांच्या अध्यक्षतेखालील १६ सदस्यीय पीठाने या प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांची बाजू ऐकून घेऊन २१ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय राखून ठेवला होता. अखेर दोन वर्षे आणि दोन महिने चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने बुधवारी भारताच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी संपर्क ठेवण्याचा, त्यांच्या कायदेशीर लढय़ाची व्यवस्था करण्यास भारताला मज्जाव केला होता. जाधव यांच्या अटकेनंतर त्यांच्याशी राजनैतिक संपर्क ठेवण्याच्या भारताच्या अधिकाराचे पाकिस्तानने उल्लंघन केले,असा ठपका न्यायालयाने आपल्या ४२ पानी निकालपत्रात ठेवला.

दरम्यान कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली, असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र नौदलातून निवृत्तीनंतर जाधव हे व्यापारानिमित्त इराणमध्ये असताना त्यांचे अपहरण करण्यात आले, अशी भारताची भूमिका आहे.