आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद देणार विश्व हिंदू परिषदेला टक्कर

अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये आपल्या नवीव संघटनेची स्थापना केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ असे या संघटनेचे नाव आहे.ही संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे.

तोगडिया हे १४ एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच नाराज होते. वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी सार्वजनिकरित्या व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेकदा भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वालाही लक्ष्य केले.

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत. विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.

तब्बल ५२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत कोकजे हे १३१ मतांनी निवडून आले होते. या निवडणुकीत कोकजे यांना एकूण २७३ प्रतिनिधींपैकी १९२ प्रतिनिधींनी मतदान केलं. गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा या निवडणुकीत पराभव झाला होता.