पुण्यातील ११० उद्यानांमध्ये तुषार सिंचनाद्वारे पाण्याच्या बचतीची आंतरराष्ट्रीय दखल

पुणे – पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला व पुणे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या ११० उद्यानांमध्ये तुषार सिंचन योजना कार्यान्वित करत पाण्याची बचत करून उल्हास यादव यांनी इरिटेक इंजिनिअर्सच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचे महत्वाचे कार्य केले आहे. या कार्याबाबत पुण्यातील उल्हास यादव यांना ‘पाणी नियोजन व निसर्ग संवर्धन’ कार्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता पुरस्काने गौरविण्यात आले आहे.

दुबई येथे झालेल्या समारंभात संयुक्त अरब अमिरातीचे राजे सुहल मोहम्मद अल झुरानी व संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री  अब्दुल्ला अल सालेम यांच्या हस्ते पुण्यातील इरिटेक इंजिनिअर्स या कंपनीचे सर्वेसर्वा  उल्हास यादव यांना नुकताच प्रदान करण्यात आला.’अचीव्हार्स वर्ल्ड’ या सेवाभावी संस्थेच्या इंडियन अचीव्हार्स फोरमतर्फे गेली १२ वर्षे आंतरराष्ट्रीय उद्योजकता क्षेत्रासाठी परिषदा घेऊन उद्योजकांना “प्रेरणा पुरस्कार”देऊन त्यांचा गौरव करते. यावर्षी आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या संधी या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत ‘पाणी नियोजन व निसर्ग संवर्धन’ कार्यासाठीचा आंतरराष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार उल्हास यादव यांना प्रदान करण्यात आला.

दुबई येथे झालेल्या गौरवाबद्दल उत्तर देताना उल्हास यादव म्हणाले की, या विशेष आंतरराष्ट्रीय पुरस्काराने आनंद झाला आहे. गेली २० वर्षे पाणी बचतीसाठी प्रयत्न करताना पाणी नियोजनाचे महत्व लक्षात आले होते. त्यामुळे हा महत्वाचा विषय घेऊन पाणी नियोजन ही एक चळवळ व्हावी ही इच्छा आहे. इतर कोणत्याही आनंदापेक्षा निसर्गाच्या संवर्धनातून होणारा आनंद अधिक मोठा आहे.

जलचक्राचे महत्व ओळखून शहरे व आजूबाजूचा परिसर झाडांच्या, बागांच्या आच्छादनाखाली आणून शहराचे सौंदर्य वाढवणे व त्यामाध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आद्य कार्य समोर ठेऊन उल्हास यादव यांनी इरिटेक इंजिनिअर्सच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुणे शहर व परिसरातील सर्व महत्वाच्या बागांचे पाणी नियोजन करून शहरातील बागांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करून पाण्याची मोठी बचत केली आहे. या पुरस्काराबद्दल पाणी नियोजन व संवर्धन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इरिटेक इंजिनिअर्स या कंपनीचे कौतुक होत आहे.