शिवसेनेत अंतर्गत धुसफूस? संजय राऊतांच्या ‘त्या’ घोषणेमुळे शेकडो उमेदवारांचा जीव टांगणीला

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये २०२२ साली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार आहे. सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी समाजवादी पार्टी, बसपा, काँग्रेस, एमआयएमसह अनेक पक्ष रणनिती आखत आहेत. त्यातच आता शिवसेनेनेही कंबर कसून तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील शिवसेनेने तेथील २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तसे पत्रकच स्थानिक नेत्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी काढले होते. शिवसेना उत्तर प्रदेशातील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मात्र, या घोषणेला ४८ तासही होत नाहीत तोवर शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. उत्तर प्रदेशात आम्ही ८० ते १०० जागा लढवू अशी घोषणा राऊत यांनी केलीये. ‘उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू,’ अशी भूमिका राऊतांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना मांडली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार अशी माहिती देण्यात आली होती. मात्र, काही तासांतच पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक शेकडो उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सर्व जागा लढवण्याची घोषणा करूनही राऊतांनी यु टर्न घेत १०० जागांची तयारी असल्याचे सांगितले आहे. यावरून पक्षात अंतर्गत धुसफूस तर सुरू नाही ना अशी एक चर्चा सुरू झाली आहे. किंबहुना पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय आपणच घेत असल्याचे राऊत यांना अप्रत्यक्षपणे दाखवायचे आहे म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले असावे अशी देखील एक शक्यता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या