राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संदिग्धता ; राणेंच्या समावेशाची उत्सुकता

मुंबई : फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार केंव्हा होणार याबाबत राजकीय वर्तुळातून उलटसुलट माहिती दिली जात असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार केंव्हा होणार याची भाजपमधील इच्छुकांना उत्सुकता लागली आहे . या विस्तारात शिवसेनेला स्थान दिले जाणार कि नाही या बाबतही कसलीच माहिती भाजप शिवसेनेच्या सूत्रांकडून दिली जात नसल्याने संभ्रम वाढला आहे .

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसमधून बाहेर पडतील यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झाले आहे. राणे यांना राज्य मंत्रिमंडळात महत्वाचे खाते देण्याचे आश्वासन भाजप नेतृत्वाकडून दिले गेले आहे असेही सांगण्यात येते . असे ठोस आश्वासन मिळाल्याखेरीज राणे हे काँग्रेसबाहेर पडणार नाहीत असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येते .

त्यामुळे विस्तारात राणे यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल असे गृहीत धरले जात आहे. राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देताना भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या मंत्र्याला वगळले जाणार याची उत्सुकता लागली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना आपापल्या कामगिरीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मंत्र्यांनी सादर केलेलं अहवाल आणि आपले मूल्यांकन यांच्या आधारावर कोणाला वगळायचे आणि कोणाला ठेवायचे याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेतला जाईल .

मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे बड्या मंत्र्यांपैकी कोणालाही वगळण्याची शक्यता नसल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले . राणे यांना कोणते खाते देणार याची उत्सुकताही काँग्रेस आणि भाजप वर्तुळात आहे . नवरात्रीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता उपलब्ध झालेल्या नव्या माहितीनुसार दिवाळीनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे जवळपास निश्चित आहे. शिवसेना सध्या पुन्हा सरकारबाहेर पडण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले जाते आहे . त्यामुळे शिवसेनेला मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल का याबाबत भाजप सूत्रांकडून मौन पाळले जात आहे .

You might also like
Comments
Loading...