इंटरसिटी : ५० दिवसांत सुरू करण्याचा प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा –  जेऊर-वाशिंबेदरम्यान सध्या रेल्वे रुळाखालील खडी बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामामुळे पुणे – सोलापूर -पुणे इंटरसिटी (इंद्रायणी) १२५ दिवसांकरिता बंद करण्यात आली. रेल्वे प्रशासन ब्लॉकचा वेळ वाढवून इंद्रायणी एक्स्प्रेस ५० ते ५५ दिवसांत पुन्हा धावेल, अशा पद्धतीचा प्रस्ताव तयार करीत आहे. त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेस लवकर धावण्याची शक्यता आहे. सोमवारी हा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला पाठवण्यात येणार आहे.

मुख्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. जेऊर- वाशिंबेदरम्यान खडी टाकण्यासाठी सकाळी ९.५० ते ११.३५ मिनिटापर्यंत ब्लॉक घेण्यात येत आहे. सध्या असलेला ब्लॉकचा कालावधी १.४५ मिनिटावरून अडीच तास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर हे साध्य होईल. परिणामी १२५ दिवसांकरिता रद्द झालेली इंद्रायणी ५० ते ५५ दिवसानंतर पुन्हा धावू शकेल. ब्लॉकचा वेळ वाढवण्याचा आमचा विचार सुरू आहे.तसा प्रस्ताव पाठवणार आहोत, असे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक प्रवीण वंजारी यांनी सांगितले.