कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधा – गिरीष महाजन

girish mahajan

नाशिक : शासकीय विभागांनी आणि संबंधितांनी नागरिकांच्या समस्या तत्परेने सोडवाव्यात आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधावा, असे निर्देश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले. यावेळी एकूण 295 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते .

सकाळी अकरा वाजता जनता दरबारला सुरूवात झाल्यानंतर प्रथम नाशिक तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांवर सुनावणी झाली. त्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली. नाशिक 33, दिंडोरी 22, निफाड 65, पेठ 5, सिन्नर 73, त्र्यंबकेश्वर 12, सुरगाणा 7, इगतपुरी 25, देवळा 21, चांदवड 22 आणि कळवण तालुक्यातील 8 नागरिकांच्या समस्यांबाबत सुनावणी झाली. मालेगाव, बागलाण, येवला आणि नांदगाव तालुक्यासाठी 6 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता मालेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मालू कॉम्प्लेक्स कॉलेज ग्राऊंड येथे ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रत्येक नागरिकाची आणि अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत महाजन यांनी नागरिकांच्या अर्जावर निर्णय दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कार्यवाही करून संबंधितास त्याबाबत कळविण्यात यावे तसेच तक्रारींबाबत सकारात्मक दखल घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.वृद्ध कलावंतांना मानधन देण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरीत समिती स्थापन करावी आणि निर्णयप्रक्रीया पुर्ण करावी, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषदेने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, निफाड तालुक्यातील शिवरस्त्याबाबत मोजणी करून अतिक्रमणधारकांकडून वसूली करावी, निफाड तालुक्यातील गोरठाण येथील डीपी तातडीने बसवावी, प्रत्येक गावात स्माशनशेड होईल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, नाशिक-दिंडोरी आणि नाशिक-येवला रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, ओझरखेड गावातील पर्यटन विकासाबाबत कामे करताना गावातील सुविधांबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री महाजन यांनी विविध समस्यांबाबत सुनावणी करताना दिले.