अवैध पिस्तुल निर्मिती व तस्करी करणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

crime

सांगली : अवैधरित्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची निर्मिती व तस्करी करणार्‍या आंतरराज्य टोळीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाला यश आले आहे.या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रतापसिंह बहादूरसिंग भाटिया याला  देखील अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे

Loading...

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लालबाग (मध्य प्रदेश) येथे छापा टाकून शस्त्र निर्मितीचा कारखानाच उदध्वस्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून आतापर्यंत या टोळीकडून दहा लाख रूपये किंमतीची २६ देशी बनावटीची पिस्तुले व ६४ जीवंत काडतुसे हस्तगत केली आहेत, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली. या पत्रकार बैठकीस पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे व पोलिस निरीक्षक राजन माने आदी उपस्थित होते. या विशेष धाडसी कामगिरीबाबत या पोलिस पथकाला रोख २५ हजार रूपयांचे पारितोषिक आपण देत असल्याचेही विश्‍वास नांगरे- पाटील यांनी जाहीर केले.

अटक केलेल्यात या शस्त्र निर्मिती व तस्करी करणार्‍या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रतापसिंह बहादूरसिंग भाटिया (वय ४५, रा. लालबाग, ता. धरमपुरी, जि. धार, मध्यप्रदेश) व त्याचा पश्‍चिम महाराष्ट्रातील वितरक अजीमर अकबर मुल्ला (वय ४०, रा. नागठाणे, ता. कराड, जि. सातारा) या दोघांचा समावेश आहे. गत आठवड्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्यास आलेल्या सनीदेव प्रभाकर खरात (वय २०, रा. सिंधु- बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (वय २७, रा. नागझरी, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तुले व २७ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. या दोघांकडे केलेल्या चौकशीत या दोघांनीही ही शस्त्रे मध्य प्रदेश राज्यातील लालबाग येथून आणल्याची कबुली दिली होती. या माहितीआधारे राजन माने यांच्या नेतृत्वाखालील एक पोलिस पथक मध्य प्रदेशला रवाना झाले होते. त्याठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने लालबाग येथे छापा टाकून प्रतापसिंह भाटिया याला अटक केली.

तीन लाख रूपये किंमतीची देशी बनावटीची सहा पिस्तुले यावेळी हस्तगत करण्यात आली. प्रतापसिंह भाटिया याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याच्या घरात आणखी काही शस्त्रे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकून तपासणी केली असता एक लाख ८५ हजार ६७५ रूपये किंमतीचे एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तुल, आठ गावठी कट्टे व २७ जीवंत काडतुसे असा शस्त्रसाठा मिळून आला. प्रतापसिंह भाटिया याच्या चौकशीत अजमीर मुल्ला हा या शस्त्रांची विक्री पश्‍चिम महाराष्ट्रात विक्री असल्याची माहिती सामोरी आली. त्यानुसार या पोलिस पथकाने अजमीर मुल्ला याच्या नागठाणे येथील घरावर छापा टाकून एक लाख ५२ हजार रूपये किंमतीचे दोन पिस्तुल, एक रिव्हॉल्व्हर व दहा जीवंत काडतुसे असा शस्त्रसाठा हस्तगत केला. ही शस्त्रे प्रतापसिंह भाटिया याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली अजमीर मुल्ला याने दिली आहे. या दोघांना येथील न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...