fbpx

भारत बंदमधील हिंसाचार हा पूर्वनियोजितच; अनेकांना मिळाले होते शस्त्राचे ट्रेनिंग

टीम महाराष्ट्र देशा: अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशभरात २ एप्रिल रोजी भारत बंद पुकारण्यात आला होता. याच दरम्यान काही भागात हिंसाचार झाला, ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, आता हा बंद आणि हिंसाचारबद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून हे आंदोलन पुर्वनियोजित होते, तसेच काही संघटनांनी युवकांना शस्त्राचे प्रशिक्षण दिल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.

अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये असणारी तत्काळ अटकेची कारवाई न करता चौकशी करून संबंधीताला अटक करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात २ एप्रिलला भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंद दरम्यान मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात  हिंसक वळण लागले होते. मात्र हा हिसाचार अचानक घडला नसून तो पूर्वनियोजित असल्याची माहिती इंटेलीजेंस आयजी मकरंद देउस्कर यांनी दिली आहे, तसेच या संदर्भात 30 ते 35 संघटना पोलिसांच्या रडारावर असून चौकशी सुरु असल्याच हि त्यांनी सांगितले आहे.

बंद काळामध्ये काही अधिकाऱ्यांची भूमिका देखील संदिग्ध असून प्रत्यक्ष किंव्हा अप्रत्यक्षपणे हिंसाचाराच्या घटनांमध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.