‘भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षात प्रवेश करणाऱ्या तृप्ती सावंतांकडून बाळासाहेबांचा अवमान’

uddhav

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांना जवळपास वर्षभराचा अवधी असतानाच सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राज्याची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेवर आपलीच सत्ता असावी यासाठी राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत.

दरम्यान, काल भाजप स्थापना दिवसाचा मुहूर्त साधत शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तृप्ती सावंत यांनी केले होते. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला येत्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु त्यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेच्या नेत्यांनी आता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलेला आहे. ‘तृप्ती सावंत यांनी भाजपसारख्या बेगडी हिंदुत्व असलेल्या पक्षाचा आधार घेतला. त्यांनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केला आहे’ अशी प्रतिक्रिया आता मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे. महाडेश्वरांना शिवसेनेने वांद्रे पूर्व मतदारसंघातून तिकीट दिल्यानेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर सावंतांची पक्षातून हकालपट्टी झाली, तर बंडखोरीचा फटका बसल्याने सावंतांसह महाडेश्वरही पराभूत झाले होते.

‘2019 मध्ये तृप्ती सावंत यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. शिवसेनेने त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय केलेला नाही. पण त्यांनी आता भाजपसारख्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षाचा आधार घेतलाय. त्यांनी त्या पद्धतीने शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला आहे. त्यांच्या जाण्याने कोणत्याही पक्षावर, मतदारसंघातही परिणाम होणार नाही; असा दावा देखील महाडेश्वरांनी केला.

दरम्यान, २०१९ मध्ये तृप्ती सावंत यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. तर, तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत ही निवडणूक झाली. यामुळे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या महाडेश्वर यांना पराभव स्वीकारावा लागला. तर, तृप्ती सावंत यांचा देखील प्रभाव झाला होता. या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला झाला. झिशान सिद्दीकी यांनी ‘मातोश्री’ च्या अंगणात काँग्रेसचा झेंडा फडकावला होता.

महत्वाच्या बातम्या