पूरग्रस्तांचे पंचनामे करुन तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश: दादाजी भुसे

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पांझरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून २८ हजार क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पांझरा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन संबंधित यंत्रणांनी तत्काळ अहवाल सादर करावा. नुकसानग्रस्तांना शासन निर्णयाप्रमाणे मदत करण्यात येईल. तसेच जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस होईल, असा इशारा वेध शाळेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबावे, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी  दिले.

पांझरा नदीला पूर आल्याने अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे  हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पूरस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.पवनीकर, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, धुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता शहापुरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे  म्हणाले, ‘साक्री तालुक्यातील गरताड येथील दोन व्यक्ती बेपत्ता आहेत. या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवावी. वीज वितरण कंपनीने पाणीपुरवठा आणि रुग्णालयांचा वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करावा. आरोग्य विभागानेही दक्ष रहावे. सर्पदंशावरील लशीसह आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन अहवाल सादर करावा. अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाण्यातून नकाणे तलाव भरुन घ्यावा.
तसेच पांझरा नदीच्या पूर पाण्यातून सोनवद प्रकल्प भरुन घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. महानगरपालिकेने नदी काठावर स्वच्छता मोहीम राबवावी. कृषी विभागाने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे. तसेच मकावरील लष्करी अळी, कपाशीवरील बोंडअळीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी’ , अशाही सूचना पालकमंत्री भुसे  यांनी दिल्या. जिल्ह्यात पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे महसूल, कृषी, ग्रामपंचायत विभागाने तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावेत. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी आमदार प्रा. शरद पाटील, हिलाल माळी यांनी सूचना केल्या.

नागरिकांनी सतर्क रहावे
धुळे जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असा इशारा वेध शाळेने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, नाला किंवा जलाशयांच्या काठाजवळ जावू नये. नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी यावेळी केले. दरम्यान, पालकमंत्री भुसे यांनी देवपुरातील नदी काठावरील घरांची पाहणी केली.

जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे म्हणून धनंजय मुंडेंनी वैद्यनाथाला घातले साकडे

‘मोदींचा भारतरत्न देऊन सन्मान केला पाहिजे’

कलम 370 हटवल्यानंतर मोदींची होतेय शिवरायांशी तुलना