वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश

MSEB

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तसेच सद्यस्थितीत किंवा येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी अभियंता व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर उपाय करण्याची सूचना त्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना केलेली आहेत.

सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवनमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांच्यासह अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची उपस्थिती होत. वादळ, गारपिट किंवा मुसळधार पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ताबडतोब कार्यवाही करण्यात यावी. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा तत्परतेने सुरु करण्यात यावा. तसेच रोहित्र, वीजखांब, केबल्स, ऑईल व इतर साहित्य संबंधीत कार्यालयांनी उपलब्ध करून ठेवण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी यावेळी केली. बारामती व कोल्हापूर परिमंडलातील कार्यालयांना याप्रमाणेच सूचना देण्यात आलेल्या आहेत.

पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी तसेच पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडल अंतर्गत सर्व विभागांमध्ये 24 तास कार्यरत असणारे दैनंदिन नियंत्रण कक्ष उघडण्यात यावेत असे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले. यासोबतच खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठीची उपाययोजना म्हणून मान्सूनपूर्व वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यामध्ये रोहित्राची तपासणी, त्याचे अर्थिंग व टर्मीनल कनेक्शन चेक करणे, ऑईलची पातळी कायम ठेवणे, फिडर पिलरची दुरुस्ती करणे, वीजतारांजवळील झाडांच्या फांद्याची छटाई, डिस्ट्रीब्यूशन बॉक्समधील फ्यूज बदलविणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण,गंजलेले वीजखांब बदलणे, वीजतारांमध्ये स्पेसर्स बसविणे, स्टेवायरने वीजखांबांचा आधार मजबूत करणे, फुटलेले इन्सूलेटर बदलणे, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे. यासोबतच उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, अर्थींग, पॉवर टॉन्सफॉर्मरचे ऑईल फिल्टरेशन, रिले टेस्टींग, ग्रिसींग, इन्सूलेटर क्लिनींग आदी कामे करण्यात येत आहेत.

खंडित वीजपुरवठ्याची तक्रार नोंदविण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक 24×7 उपलब्ध आहेत.