‘चीन-पाकिस्तानकडे लक्ष देण्याऐवजी ते खोटा इतिहास सांगताहेत’, नाना पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करताना एक मोठा दावा केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच इंग्रजांपुढे दया याचिका दाखल केली होती, असा दावा राजनाथ सिंह यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केला. याच कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आहे.

राजनाथ सिंह यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजनाथसिंह हे संरक्षणमंत्री आहेत, देशाच्या सीमेवर चीन-पाकिस्तानकडून सुरु असलेल्या आगळीकीकडे लक्ष देण्याऐवजी लोकांना खोटा इतिहास सांगून ते दिशाभूल करत आहेत. सावरकरांच्या माफीनाम्याचे खापर महात्मा गांधींवर फोडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न ते करत आहे’ अशी टीका पटोले यांनी केली आहे.

काय म्हणाले राजनाथ सिंह?
राजनाथ सिंह म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळी खोटं पसरविण्यात आले. वेळोवेळी असे सांगण्यात आले की, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे दया याचिका केली पण महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरुन अंदमान तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांकडे दया याचिका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्याचा नेहमीच प्रयत्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक महान स्वातंत्र्यसैनिक होते, सावरकर एक महान नायक होते आणि भविष्यातही राहतील असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या