टीका करण्यापेक्षा अशी स्थिती उद्भवू नये या साठी सूचना करा – उद्धव ठाकरे

uddhav thackeray

मुंबई – अतिवृष्टीमुळे मुंबईत पुन्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होऊ नये या साठी विधायक सूचना करा , केवळ राजकारण , विरोध म्हणून मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करू नका , असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले .

श्री . ठाकरे म्हणाले की , नालेसफाईच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेला धारेवर धरणे योग्य नाही . नाले सफाई योग्य पद्धतीनेच होत आहे . महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्या मंडळींनी पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेचा अभ्यास केला पाहिजे . थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला तर २९ ऑगस्टला जसे पाणी तुंबले तसे तुंबणारच. नालेसफाई कितीही चांगल्या पद्धतीने केली तरी एवढ्या प्रचंड पावसात पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना मर्यदा येतात हे टीका करणाऱ्या मंडळींनी लक्षात घ्यावे.

२६ जुलै २००५ रोजी नंतर महापालिकेने बऱ्याच काही गोष्टी शिकल्या आहेत . २९ ऑगस्ट च्या पावसानेही आम्हाला बरेच काही शिकवले आहे. महापालिकेच्या नाले सफाई कामात व अन्य कामांत राहिलेल्या त्रुटींचा आम्ही अभ्यास करीत आहोत . त्या त्रुटी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले . ते पुढे म्हणाले की , महापालिकेच्या कारभारावर टीका करणाऱ्या लोकांनी अतिवृष्टीच्या स्थितीत रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी तांत्रिक उपाययोजना सुचवाव्यात, त्याचा निश्चित विचार केला जाईल असेही ते म्हणाले .

मुंबईत पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये या साठी सर्व संबंधित सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय असला पाहिजे . महापालिका , रेल्वे , एमएमआरडीए या यंत्रणांत समन्व्य असला तर अनेक कामांत सुधारणा होईल, असेही त्यांनी सांगितले .

२६ जुलै २००५ वेळची स्थिती आणि २९ ऑगस्ट ची स्थिती यात मोठा फरक आहे . २९ ऑगस्ट ला महापालिकेच्या सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागल्या म्हणूनच मुंबईतील पाण्याने तुंबलेले रस्ते दुसऱ्या दिवशी मोकळे झाले , असेही त्यांनी सांगितले .