नानार प्रकल्पासंदर्भात जनतेच्या शंका दूर केल्या जातील – मुख्यमंत्री

devendra fadanvis

मुंबई : शिवसेनेसह इतर पक्षातून कोकणातील नाणार तेल रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत आहे. मात्र कोकणात नाणार तेल रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थतीमध्ये आणणारचं असल्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे सध्या नाणारवरून आरोप- प्रत्यारोपाच राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर कोकणातील नाणार तेल रिफायनरी प्रकल्पाबाबत काही नेत्यांनी घेतलेल्या शंका या राजकीय स्वरूपाच्या असल्याने त्या दूर करणे कठीण आहे. मात्र जनतेच्या शंका लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे. ते एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, नाणारमधील रिफायनरी प्रकल्प हा विदर्भात हलविणे शक्य नाही. कारण तो समुद्रालगतच होणे अत्यावश्यक आहे. अन्यत्र तो होऊच शकत नाही. विदर्भासाठी वेगळा इनलँड रिफायनरी प्रकल्प उभारावा, अशी मागणी आपल्या सरकारने आधीच केंद्राकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

कोणत्याही नेत्याचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेला विश्वासात घेऊनच नाणार प्रकल्पाची उभारणी केली जाईल. ही प्रक्रिया सुरू असून त्याला स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कोस्टल व इनलँड अशा दोन प्रकारच्या रिफायनरी असतात. नाणारमध्ये येऊ घातलेला प्रकल्प हा कोस्टल रिफायनरीचा आहे. इनलँडपेक्षा तो कितीतरी पट मोठा असतो. या प्रकल्पामुळे देशांतर्गत तेलाची गरज भागवून भारत हा निर्यात करण्याच्या परिस्थितीत येईल. युद्धजन्य परिस्थितीत किमान सहा महिन्यांचा तेलसाठा देशाकडे राहील. ही दूरदृष्टी बाळगून नाणारचा प्रकल्प उभारायचा आहे. त्याला विरोध करणे म्हणजे विकासाला विरोध करणे होय.

या प्रकल्पामुळे कोकणातील आंबा व इतर पिके नष्ट होतील ही शंका अनाठायी आहे. जामनगरमध्ये रिलायन्सचा रिफायनरी प्रकल्प आहे आणि तेथे आंब्याचे मोठे उत्पादन होऊन निर्यातदेखील होते. कोकणात प्रदूषण मोठ्या प्रमाणात येईल, ही शंकाही योग्य नाही. मुंबईत चेंबूरला इतकी वर्षे रिफायनरी आहे. तेथे कोणते प्रदूषण वाढले आणि बळी गेले? अन् नाणारमधील प्रकल्प तर अत्याधुनिक असल्याने प्रदूषणाचा प्रश्नच नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.