..त्यापेक्षा लोकांचे जीवन आनंदी कसे होईल याकडे लक्ष द्या,’ पालकमंत्र्यांचा मनपाला सल्ला

औरंगाबाद : ‘महानगरपालिकेने वॉटर, मीटर, गटर यापलीकडे शहरातील लोकांचे जीवन आनंदी कसे होईल यासाठी प्रयत्न करायला हवे. आणि मनपाच्या याच प्रयत्नांची दखल केंद्र सरकारने घेतली आहे’. पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. ईज ऑफ लिव्हिंग (ईओएल) २०२० चा अहवाल गुरुवारी भारत सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास खात्याने जाहीर केला आहे.

त्यात औरंगाबादने मागील वर्षीच्या तुलनेत ६३ स्थानावरुन थेट ३४ व्या स्थानी मजल मारली आहे. विशेष म्हणजे जीवन गुणवत्तेत औरंगाबादने पूर्ण देशात १३ व्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाईन माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला.

गुरुवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत औरंगाबादला ईज ऑफ लिव्हिंगमध्ये एकूणच ३४ वा क्रमांक मिळाला आहे. जो नाशिक, रांची आणि जबलपूरसारख्या शहरांपेक्षा उच्च आहे. तर औरंगाबादचे जीवन गुणवत्ता चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि जयपूर सारख्या शहरांपेक्षा चांगले आहे.

यावेळी पालकमंत्र्यांनी आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या व्हाटसअप वरून व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘ शहराने या सर्वेमध्ये चांगली झेप घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, सेवासुविधा यात शहराची कामगिरी नजरेत भरणारी आहे. मनपाने पुरवलेल्या सेवा या आधारावर ही क्रमवारी मिळवलेली आहे. या प्रगतीमध्ये राज्यसरकारच्या सहकार्याचा मोलाचा वाटा आहे.

आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शहराबद्दल विशेष आपुलकी आहे. त्यामुळेच शहरासाठी त्यांनी विशेष योजना जसे १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना, १५२ कोटींचे रस्ते त्यांनी मंजूर केले आहेत. जनतेने महापालिका प्रशासनावर दाखवलेल्या विश्वासाचेच हे फळ असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या