सॅल्यूट! बेघर बालकांना पाहून जागी झाली पोलिसांतील माणुसकी, चिमुकल्यांना मिळाला आसरा

Inspiring Work Of Aurangabad police Who helped Homeless childrens to find shelter

औरंगाबाद : क्रांती चौकात कर्तव्य पार पाडत असताना क्रांती चौक पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक अनिता बागुल यांना एक बेघर कुटुंब पुलाखाली वास्तव्य करत असताना दिसले. कुटुंबाची अवस्था पाहून पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी बेघर बालकांना मुस्कान मोहिमेअंतर्गत बालनिरीक्षणगृहात गुरुवारी दाखल केले. या घटनेमुळे पोलिसांतील माणुसकीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या घटनेचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

औरंगाबादेतील क्रांती चौक भागात कर्तव्य बजावत असताना उपनिरीक्षक बागुल यांना एक बेघर कुटुंब निदर्शनास आले. त्यांनी त्या कुटुंबाची विचारपूस केली असता रमेश दामोदर सोनवणे (वय ७०, रा. लखमापूर, जि. जळगाव) हे त्या कुटुंबाचे प्रमुख असल्याची माहिती मिळाली. त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. ते दोन महिन्यांपासून भाड्याच्या घराच्या शोधत आहेत, परंतु त्यांना अनेक जणांनी भाड्याने घर देण्यास नाकारले.

किरायाने कुणीही घर देत नसल्याने त्यांच्यावर क्रांती चौक पुलाखाली वास्तव्य करण्याची वेळ आली. त्यांची पत्नी आसपासच्या परिसरात धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली. हे कळताच पोलीस निरीक्षक डॉ. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिता बागूल यांनी जिल्हा बालसंरक्षण कक्षातील सुनील गायकवाड, कैलास पंडित, अन्नपूर्णा ढोरे यांना पोलीस ठाण्यात बोलवून कुटुंबातील बेघर बालकांना बाल समिती समोर हजर केले. यानंतर या बालकांना बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या