अंगभूत कलागुणांच्या जोरावर ‘विशेष’ मुले समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी – उपसंचालक मोहन राठोड

उपसंचालक मोहन राठोड

पुणे दि. 20 : जन्मजात व्यंगावर मात करत आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर ‘विशेष’ मुले समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड यांनी आज केले.

श्री. मोहन राठोड यांनी त्यांचे वडील दिवंगत फुलसिंग राठोड यांच्या व्दितीय पुण्यतिथी निमित्त येथील द पुना स्कूल ॲण्ड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्टच्या अंध मुलांच्या शाळेला भेट देवून मुलांना फळे व खाऊचे वाटप केले तसेच संस्थेला दहा हजार एक रुपयांची देणगी दिली. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमानंतर श्री. मोहन राठोड बोलत होते. यावेळी शाळेचे प्राचार्य चंद्रकांत भोसले, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, सुमित्रा मोहन राठोड, सामाजिक कार्यकर्ते संदीप जगदाळे उपस्थित होते.

श्री. मोहन राठोड म्हणाले, काही मुले जन्मताच दिव्यांग म्हणून जन्माला येतात. मात्र या दिव्यांग मुलांना निसर्ग कलागुण बहाल करतो. या कलागुणांच्या जोरावर ही मुले समाजातील इतरांसमोर एक आदर्श निर्माण करतात. या मुलांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. पुणे अंध मुलांची शाळा या दिव्यांग मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी घडवते, हे मोठे काम आहे. समाजातील अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा गोष्टींची आवश्यकता असते.

यावेळी शाळेतील मुलांनी आर्केस्ट्राच्या माध्यमातून “तूच सुखकर्ता, तूच दुख:हर्ता”, “मेरी सपनों की राणी कब आवोगी तू”, “प्रेम रतन धन पाओ”, “आता उतावीळ झालो” अशी धमाल गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचर्य चंद्रकांत भोसले यांनी केले. तर आभार कृष्णा जगदाळे यांनी मानले.