उर्जा विभागाच्या प्रधान सचिवांकडून औरंगाबादेतील विकासकामांची पाहणी; केल्या ‘या’ सूचना!

mscb

औरंगाबाद : राज्याचे उर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी महावितरण व महापारेषणच्या विविध विकासकामांची पाहणी केली. महावितरणच्या कामाबाबत त्यांनी लाभार्थ्यांशी चर्चा करून समाधान व्यक्त केले. वाघमारे यांनी शेंद्रा येथे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सुभाष कचकुरे यांच्याकडे बसविण्यात आलेल्या सौर कृषिपंपाची पाहणी केली. तसेच ढगाळ वातावरणात पाऊस चालू असतानाही सौरपंप काम करतो, हे त्यांनी सौरपंप चालू करून दाखवले.

सौरपंपामुळे दिवसा वीज मिळत असल्याने याआधी होणारी गैरसोय टळली असल्याचे सांगितले. तसेच शेंद्रा एमआयडीसी उपकेंद्रातील उपलब्ध जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पातून कमी दरांद्वारे किती वीज निर्मिती होते आणि हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून किती वीज निर्मिती झाली. हे त्यांनी अधिकार्‍यांकडून जाणून घेतले.

यावेळी महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदवले, परिमंडलाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, औरंगाबाद ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने, उपकार्यकारी अभियंता सुनील शिंदे, सहायक अभियंता मनीष मगर, मनीष डिघुळे, बाळासाहेब बर्वे, योगेश चेंडके यांच्यासह महावितरण, महापारेषणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, वाघमारे यांनी दोनदिवसीय औरंगाबाद दौर्‍यात शनिवारी पारेषण कंपनीच्या एकतुनी येथील ७६५ केव्ही उपकेंद्रास भेट देऊन माहिती घेतली.

महत्त्वाच्या बातम्या