राजकीय सूडबुद्धीने जलयुक्त शिवार योजनेची चौकशी- मोनिका राजळे

monika rajale

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील दुष्काळी तालुक्यांना व शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारणाची कामे होऊन पाण्याची पातळी वाढली.

महाविकास आघाडी सरकारला फक्त राजकारण करायचे आहे आणि त्यामुळे सरकार एसआयटी मार्फत चौकशी करत असुन त्यांच्या चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार हे केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप करीत आहे, अशी टीकाही आ.मोनिका राजळे यांनी केली आहे.

कॅगने ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्याचे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे.

जलयुक्त शिवार योजनेवर ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च करून ही योजना राबवली मात्र, असे असतानाही राज्यात टँकरची संख्या वाढतच आहे. तसेच राज्यातील भूजल पातळी वाढवण्यात अपयश आले. तसेच राज्यातील सर्व गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दीष्ट अयशस्वी ठरले आहे, असा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला होता.

मात्र ही चौकशी फक्त राजकारण करण्यासाठी केली जात असल्याचा दावा आमदार मोनिका राजळे यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ही महत्त्वाकांक्षी योजना होती व त्या माध्यमातून शेतकऱ्यांनां मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कॅगचे नाव सांगून लावलेल्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नसल्याचा दावा आ.राजळे यांनी केला आहे.