जलयुक्त शिवार योजनेची चौकशी; भाजप पदाधिकाऱ्याचे थेट स्पॉटवर जाऊन दिले सरकारला उत्तर

ahamandnagr

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनांमधील एक असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्यामुळे आता भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी थेट जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून झालेल्या तलावाची परिस्थिती दाखवत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकार हे केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप करीत आहे, अशी टीकाही प्रा.बेरड यांनी केली आहे.

कॅगने ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्याचे बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे.

जलयुक्त शिवार योजनेवर ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च करून ही योजना राबवली मात्र, असे असतानाही राज्यात टँकरची संख्या वाढतच आहे. तसेच राज्यातील भूजल पातळी वाढवण्यात अपयश आले. तसेच राज्यातील सर्व गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दीष्ट अयशस्वी ठरले आहे, असा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला होता.

मात्र, भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य प्रा.बेरड यांनी थेट मांडवा (ता.नगर) येथे जात जलयुक्त शिवार योजनेच्या काम केलेल्या तलावाला भेट दिली. हा तलाव सध्या पूर्णक्षमतेने भरला असून त्यामुळे गावातील लोकांना कसा फायदा होतोय, असे सांगणारा व्हिडिओच प्रा.बेरड यांनी या तलावासमोर उभे राहतच तयार केला, व त्याद्वारे त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रा.बेरड यांनी म्हटले आहे की, नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम झाले, त्याला आज भेट दिली. यावेळी काही शेतकरी उपस्थित होते. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. या तलावामध्ये साठलेल्या पाण्यामुळे या गावातील जमीनीची भूजल पातळी वाढणार आहे.

पर्यायाने विहिरींना पाणी येईल, व या परिसरातील सर्व शेती बारामहिने बागायती होईल, अशा प्रकारचे मोठे काम जलयुक्त शिवारमुळे झाले आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला स्वतःला काही करता येत नाही, त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यशस्वीपणे राबवलेल्या महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजनेवर आक्षेप घेण्याचे काम करीत आहेत, अशी टीका प्रा.बेरड यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-