राजेश टोपेंनी जिंकली राज्याचे मनं, दिवसरात्र राबत असणाऱ्या पोलिसांची मायेने चौकशी

पुणे : जगभरात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसने बहुतांश देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चीनमधून प्रसार झालेल्या कोरोनाचा विषाणू आता भारतातील बहुतांश राज्यात पसरला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, गर्दीची ठिकाणे, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास वैद्यकीय आणीबाणी लागू झाल्याने सर्वकाही बंद दिसत आहे.

कोरोना व्हायरसची लढण्यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. दरम्यान, कोरोनाशी लढण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेले आरोग्यमंत्र्यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन दिले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे जितके कोरोनाग्रस्तांकडे लक्ष आहे तितकेच डोळ्यात तेल घालून ड्युटी निभावणाऱ्या पोलिसांकडेही आहे, याचीच प्रचिती एका व्हिडिओत पाहायला मिळाली.

विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे सातत्याने पत्रकार परिषद घेऊन बदलणाऱ्या परिस्थितीची माहिती देत आहेत. राज्य सरकारने घेतलेली खबरदारी पाहता सोशल मीडियावर त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दिवसभर डोळ्यांत तेल घालून ड्युटी निभावणाऱ्या पोलिसांची गैरसोय तर होत नाही ना, त्यांच्या जेवणाची व्यवस्था होतेय की नाही याबद्दल सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आस्थेने विचारपूस केली आहे.

तर, रात्री उशिरा पोलिसांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य मंत्र्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. कोरोनाशी लढण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेल्या आरोग्यमंत्र्यांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन यातून घडवले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना. आरोग्य मंत्री राजेश टोपे जवळपास चोवीस तास याच कामात व्यग्र आहेत. या व्यस्ततेतून काही क्षणाची उसंत काढून ते मुंबईतील रूग्णालयात जातात. रूग्णालयात अॅडमिट असलेल्या जीवन मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या आईला ते भेटतात. अवघ्या काही मिनिटांचीच ती भेट असते. गेल्या काही दिवसांपासून हाच टोपे यांचा दिनक्रम बनला आहे.