ससून रुग्णालयात उपलब्ध होणार आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपन

पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ससून रुग्णालयात आधुनिक लेसर मशीनद्वारे दांतरोपन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता गरीब रुग्णांना दंतरोपन करणे शक्य झाले आहे. मुकुल माधव फाउंडेशनने ससून रुग्णालयात गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची पावती म्हणून मुंबईतील प्रसिद्ध वकील दीपा व जनक द्वारकादास यांनी १० लाख रुपयांची देणगी दिली असून, त्यातून ही लेसर मशीन सुविधा उभारण्यात आली आहे. या देणगीतून तीन डेंटल चेअर्स, लेसर आणि इम्प्लांट मशीन, अत्याधुनिक लूप या गोष्टी खरेदी करण्यात आल्या आहेत.

शुक्रवार, दि. ११ मे २०१८ रोजी दुपारी ४ वाजता द्वारकादास दाम्पत्याच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ससून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालायचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, दंत चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विवेक पाखमोडे व मुकुल माधवफाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी मुकुल माधव फाउंडेशनने ससून रुग्णालयात ५९ अर्भक क्षमतेचा अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक सुविधायुक्त एन्डोक्रोनॉलॉजि विभाग व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी दोन सुसज्य विश्रांती कक्षांची उभारणी केली आहे.