आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा-ओबीसी समाजावर अन्याय, खा. प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल

Dr. Pritam Munde

बीड : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्त्वात परळीमध्ये आंदोलन झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षण विषयी भूमिका मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये ओबीसींवर अन्याय होत आहे. महाविकास आघाडी सरकारने जर वेळेत न्यायालयात ‘इम्पेरिकल डेटा’ सादर करून भूमिका मांडली नाही तर येणाऱ्या काळात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा लढा आणखी आक्रमक आणि तीव्र करू असा इशारा खासदार मुंडे यांनी दिला.

निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला, नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या आधी सर्वपक्षीय बैठकीमध्ये ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

या संदर्भात खासदार मुंडे म्हणाल्या की, ‘समाजातील शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी घटनेत आरक्षणाची तरतूद केली आहे. परंतु राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ओबीसी प्रवर्गातील अनेकांना राजकीय आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. तळागाळातील सर्व समाजाच्या वंचित आणि दुर्लक्षितांना जर प्रतिनिधित्व द्यायचे असेल तर राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होणे आवश्यक आहे. मागणी करणाऱ्यांना आरक्षण द्यायचे नाही आणि ज्यांना आहे त्यांचे काढून घ्यायचे, असे दुहेरी पाप हे सरकार करत आहे. आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आणि ओबीसी समाजातील सर्वसामान्यांवर अन्याय होतो आहे. भारतीय जनता पक्ष राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी उग्र लढा देईल.’

महत्त्वाच्या बातम्या