महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून दलितांवर अन्याय वाढले – रिपाइं

blank

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ बंगल्यावर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ‘रिपाइं’ पुणे शहराच्या वतीने निषेध करण्यात आला. बंगल्यातील वस्तूंची तोडफोड करणाऱ्या जातीवादी वृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली.

दोन माथेफिरुंनी मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार केल्याचा आरोप आहे. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून दलितांवर अन्याय वाढले असून, आम्हाला पूजनीय असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळावर हल्ला होणे ही निंदनीय बाब आहे. या हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी करून, दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.

पुणे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळा येथे ‘रिपाइं’ने निषेध आंदोलन केले. यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, राष्ट्रीय निमंत्रक ऍड. मंदार जोशी, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, निलेश आल्हाट, किरण भालेराव, विनोद टोपे, राजेश गाडे, संतोष खरात, जितेश दामोदरे, सज्जन कवडे, मुकेश काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार – अजित पवार

नोव्हेंबरअखेरपर्यंत कोरोना संपेल, हसन मुश्रीफांचा दावा

पारनेरच्या प्रकरणावर मुश्रीफ म्हणतात, ‘तेव्हा हे ठरलेच नव्हते….’