fbpx

प्रवासादरम्यान चोरीच्या घटनेत वाढ

मुंबई : लोकल ट्रेनने प्रवास करणा-या प्रवाशांच्या हाताला काठीने मारत त्यांच्या हातातील मोबाईल,बॅग पळविण्याचा प्रकार घडत असतांनाच असा प्रकार विलेपार्ले स्थानकात घडला. विलेपार्ले स्थानकात एका २० वर्षीय तरुणीच्या हातावर काठी मारुन चोरट्यांनी तिचा मोबाईल चोरला आहे. प्रियांका पाठक असे या तरूणीचे नाव असून ती एका खासगी बँकेमध्ये रिकव्हरी एजंट म्हणून काम करते.

या घटनेबद्दल बोलताना प्रियांकाने सांगितले की, “मी माहीम रेल्वे स्टेशनवरून अंधेरीला जाण्यासाठी लोकल पकडली. विले पार्ले स्टेशन ओलांडल्यावर मी अंधेरीला उतरण्यासाठी दरवाजावर जाऊन उभी राहिले. तेवढ्यात माझ्या सहकाऱ्याचा फोन आल्याने मी तो फोन घेण्यासाठी पर्समधून मोबाईल बाहेर काढला, त्याचवेळी ट्रॅकलगत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने माझ्या डाव्या हातावर काठीने वार केला. यामुळे माझ्या हातातला मोबाईल खाली पडला” प्रियांकाने अंधेरी स्थानकात उतरल्यानंतर पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे.

अंधेरी रेल्वे पोलिसांनी प्रियांकाची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी प्रियांकाचा मोबाईल चोरणाऱ्या विरोधात चोरी आणि चोरीसाठी प्राणघातक हल्ला असा गुन्हा दाखल केला आहे.