एका राजीनाम्याने काही तासांतच २८ हजार कोटींचा फटका

इन्फोसिसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक असणारे विशाल सिक्का यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला होता. सिक्का यांच्या राजीनाम्याची बातमी येताच शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. कंपनीच्या संस्थापकांशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते आहे.

विशाल सिक्का यांनी २०१४ मध्ये इन्फोसिसचा कार्यभार स्वीकारेपर्यंत कंपनीच्या शेअर्सचं बाजार मुल्य जवळपास 1.80 लाख कोटी रूपये होतं ते पुढे कालपर्यंत 2.35 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढलं होतं. मात्र विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्याची बातमी बाजारात पोहचताच शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 11.5 टक्क्यांनी घट झाली. ‘ब्लूमबर्गच्या’ वृत्तानुसार अवघ्या काही तासांमध्ये कंपनीला जवळपास 28 हजार कोटी रूपयांचं (मार्केट कॅपिटलायजेशन) नुकसान झालं आहे.