fbpx

आता जिद्दीने उभे राहण्याची वेळ आली, शरद पवारांच्या महिला पदाधिकाऱ्यांना सुचना

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे संघटनेत एक अस्वस्थता होती त्या संदर्भात शरद पवार यांनी या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढवले. जय पराजय हा निवडणुकीचा एक भाग असतो त्याने खचून न जाता जिद्दीने उभे राहण्याची वेळ आता आली आहे, असे पवारसाहेब म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत मोदींच्या भुलथापांना जनता बळी पडली मात्र विधानसभेला असे होऊ शकणार नाही. भाजपाकडे विधानसभेसाठी नवा चेहरा नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा चेहरा आपण जनतेपुढे उभा करण्याचे काम करायचे आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचा निर्धार सर्वांनी करावा असे आवाहन खा. शरद पवार यांनी बैठकीत केले.

त्यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील उपस्थित राहून महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या पक्षाची कामगिरी लोकांपुढे मांडण्याची आता गरज आहे. तुटपुंजी कामगिरी करून मोदींनी आपली पाठ थोपटून घेतली तर आपण १५ वर्षे केलेली काम का सांगू नये, असा सवाल आ. जयंत पाटील यांनी बैठकीत उपस्थित केला. पक्षाच्या यशासाठी सर्वांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे असे आ. जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी महिलांशी संवाद साधला. भाजप धर्मांध राजकारण करत आहे. समाजासमाजात दुफळी निर्माण करते आहे. हे राजकारण आपल्याला मोडून काढायचे आहे. म्हणून भाजपला पळवून लावणे गरजेचे आहे. यांची सुरुवात आपण महाराष्ट्रातून करू आणि एकजुटीने विधानसभेच्या कामाला लागू असे आवाहन फौजिया खान यांनी केले.

खा. सुप्रिया सुळे यांनी मेळाव्यातून महिलांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे केवळ कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे असे त्या म्हणाल्या. येणाऱ्या विधानसभेला देखील असे खंबीरपणाने पक्षाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने इंडिया ७२ हा उपक्रम राबवला जाणार आहे, खा. वंदना चव्हाण यांनी त्यावेळी सांगितले. या उपक्रमात ७२ वर्षांत भारताने जी प्रगती केली आहे त्यावर कार्यक्रम घेतले जातील. शहरी भागांकडे नेहमीच आपण दुर्लक्ष केले आहे. या कार्यक्रमांतर्गत शहरी भागाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाईल असे फौजिया खान सांगितले.

दरम्यान आ. विद्या चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करून पुढे य़ेणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शक्तीने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यावेळी केले. महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद साधला व त्यांचे मनोधैर्य वाढवले. उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना लागू केली पण या योजनांचा पूरता फज्जा उडाला आहे. खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक करण्यात आली आहे.

सिलेंडर तर दिलं पण नंतरच्या सिलेंडरचे पैसे कोण देणार, वीज दिली पण त्याचे भरमसाठ बिल कोण भरणार? आपल्याला हे प्रश्न लोकांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी काम करायचे आहे. निकालांमुळे आम्ही नाराज आहोत पण तुटलो नाही हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा. रडणारे नाही तर लढणारे कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय मुंबई येथे पार पडलेल्या महिला मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार उषाताई दराडे यांच्यासोबत पक्षाच्या नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.