उद्योगमंत्री सुभाष देसाई गोत्यात !

वेबटीम:- पारदर्शितेचा मुद्दा घेऊन निवडून आलेल्या युती सरकारवर आता घोटाळ्याच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे. आधी प्रकाश मेहता यांच्यावर आरोपांची राळ उठविणाऱ्या विरोधकांनी आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना लक्ष्य केले आहे. सुभाष देसाई यांच्या उद्योग खात्यात जमिनीचा मोठा घोटाळा झाला असून एमआयडीसीने संपादित केलेल्या जमिनीपैकी तब्बल ४०० हेक्टर जमीन उद्योजकाच्या भल्यासाठी वगळण्यात आल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. उद्योग खात्यातील हा मोठा जमीन घोटाळा असून उद्योगमंत्री देसाई यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणीही मुंडे यांनी केली.

राज्यात औद्योगिक विकासासाठी मोठय़ा प्रमाणात जमिनी संपादित करण्यात येतात. अनेक वर्षे या जमिनींचा विकासही केला जात नाही आणि ज्या शेतकऱ्यांकडून त्या संपादित केल्या जातात त्यांना त्या परतही केल्या जात नाहीत. नाशिक जिल्ह्य़ातील इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाळा येथे अधिसूचित केलेल्या जमिनीपैकी तब्बल ४०० हेक्टर जमीन शिवसेनेशी संबंधित एका उद्योजकाच्या फायद्यासाठी वगळण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. याबाबत पुढील आठवडय़ाच्या कामकाजात आपण पुराव्यासह सविस्तर माहिती देणार असल्याचे सांगत त्यांनी सरकारभोवतीचे संशयाचे वलय अधिक गडद केले. मुंडे यांनी हा मुद्दा मांडताच विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मेहतांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपच्या गोटातूनच देसाई यांना टार्गेट करण्यात येत असल्याची चर्चे सध्या सुरु आहेत.